Friday, April 26, 2024
Homeनगरमयत सभासदांच्या कर्जमाफी योजनेसाठी संयुक्त समिती स्थापण्याचा निर्णय

मयत सभासदांच्या कर्जमाफी योजनेसाठी संयुक्त समिती स्थापण्याचा निर्णय

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मयत होणार्‍या संस्थेच्या सभासदांचे कर्ज तातडीने माफ व्हावे, यासाठी संस्थेच्या वतीने सर्व समावेशक आणि संस्थेच्या व सभासदांच्या हिताची योजना सुरु करण्याची मागणी उपस्थित सभासदांनी केली. या योजनेबाबत अभ्यास करून आणि राज्यातील इतर संस्थांच्या योजनांचा आढावा घेऊन सर्वंसमावेशक योजना तयार करण्यासाठी संचालक मंडळ आणि सभासद प्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची 95 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.5) नगर मधील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस होते. प्रारंभी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सन्मान चिन्ह व रोख बक्षिसे देऊन करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी कडूस यांनी संस्थेच्या कामकाजाचे आणि सभासदांच्या हितासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचे कौतुक केले. तसेच संस्थेने सभासदांच्या पाल्यांसाठीच्या शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करावी, अशी सूचना केली.

प्रास्ताविक चेअरमन विलास शेळके यांनी करत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. सभेच्या विषय पत्रिकेवर चर्चेला सुरुवात झाल्या नंतर सर्व सभासदांना बोलण्याची संधी देत त्यांचे म्हणणे ऐकून घेत जोपर्यंत त्यांच्या शंकांचे निरसन होत नाही, तोपर्यंत प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा संचालक मंडळाने घडवून आणली. विशेष म्हणजे या सभेला महिला सभासदांची उपस्थिती लक्षणीय होती. या सभेत प्रथमच महिला सभासदांनी चर्चेत सहभाग घेत आपली मते मांडली. संस्थेच्या इतिहासात प्रथमच सकाळी 11 वाजता सुरु झालेली सभा सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालली.

या सभेत संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार पोटनियम दुरुस्तीबाबतचा विषय चर्चेला आल्यानंतर सर्व सभासदांना सभासद कल्याण निधीबाबत आपले मत मांडण्याचे आवाहन करण्यात आले. संस्थेचे सभासद विकास साळुंके, अभय गट, मनोज चोभे, कैलास भडके यांनी कोल्हापूर कर्मचारी संस्थेच्या धर्तीवर मयत सभासद कर्जमाफी योजना सुरु करण्याची सूचना मांडली. सभेत संभाजी आव्हाड, विशाल महाजन, संदीप अकोलकर, गणेश चणे, डॉ.सुरेश ढवळे, सुनीता कदम, छाया नन्नवरे, वंदना धनवटे यांच्यासह सभासदांनी विविध सूचना मांडल्या.

या सभेत चेअरमन शेळके, व्हा.चेअरमन काशिनाथ नरोडे, संचालक संजय कडूस, अरुण जोर्वेकर, कल्याण मुटकुळे यांच्यासह व्यवस्थापक राजेंद्र पवार यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत सभासदांचे समाधान केले. सभेस संचालक प्रशांत मोरे, विक्रम ससे, भाऊसाहेब चांदणे, राजू दिघे, दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, अर्जुन मंडलिक, ज्योती पवार, सुरेखा महारनूर, मनिषा साळवे, संदिप मुखेकर, श्रीमती सरला कदम, उप व्यवस्थापक प्रशांत लोखंडे व कर्मचारी वृंद तसेच जिल्हाभरातून आलेले सभासद उपस्थित होते.

या सभेत सभासदांचे डिव्हिडंड व कायम निधीवरील व्याजाची रक्कम सभासदांच्या बँक खाती जमा करण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सभा संपताच ही रक्कम सभासदांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या