Friday, April 26, 2024
Homeनगरपुढील आठवड्यापासून झेडपीच्या शाळा सकाळी भरणार?

पुढील आठवड्यापासून झेडपीच्या शाळा सकाळी भरणार?

अहमदनगर |प्रतिनिधी)|Ahmednagar

वाढणारे ऊन आणि सुरू होणारा रमजान महिना यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात अशी मागणी जिल्ह्यातील शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शाळांच्या वेळाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे निर्णय घेणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

दरवर्षी उन्हाळ्यात जिल्हा परिषदेच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्यात येतात. यंदा गेल्या 15 दिवसांपासून अवकाळीचा तडाखा सुरू असल्याने उन्हाचे चटके आणि उष्णता गायब झालेली आहे. मात्र, लवकरच अवकाळीचे मळभट दूर होऊन उन्हाचा कडाका वाढणार आहे. या काळात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासह विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने दरवर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यांत झेडपीच्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्यात येतात.

यंदा अद्याप शाळांची वेळ बदलण्यात आलेली नाही. मात्र, आजपासून रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील उर्दू माध्यमातील शाळा सकाळी सुरू करण्याची मागणी होत आहे. जर उर्दू माध्यमातील शाळा सकाळी सुरू कराव्या लागत असल्यास जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमातील शाळा देखील सकाळी सुरू करण्याच्या मनस्थितीत शिक्षण विभाग आहे.

दुसरीकडे सकाळच्या सत्रात शाळा सुरू व्हाव्यात, यासाठी विद्यार्थी आणि पालकांऐवजी शिक्षक संघटना घोड्यावर बसल्या आहेत. यामुळे शाळांच्या वेळ बदलाचा निर्णय शिक्षण विभागाने आता मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्या कोर्टात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात याबाबत चर्चा होवून शक्य झाल्यास जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या