जि. प. गट, गणांचा प्रारूप आराखडा सादर

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता ( Zilla Parishad & Panchayat Samiti Elections ) गट व गणाचा प्रारूप आराखडा (Draft outline) पाठविण्यास जिल्हा निवडणूक शाखेला अखेर मुहूर्त सापडला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात हा प्रारूप आराखडा पोहचला आहे.

विभागीय आयुक्तांकडे दाखल झालेल्या प्रारूप गट, गण रचनेची गुरूवारपासून (दि.26) पडताळणी सुरू होणार आहे. पडताळणीनंतर, विभागीय आयुक्त गट, गणाचा प्रारूप आराखडा 31 मे रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करतील. त्यानंतर जिल्हाधिकारी दि.2 जून रोजी तो नागरिकांच्या अवलोकनार्थ घोषित करतील.

जिल्हा परिषदेच्या सदस्य, पदाधिकार्‍यांची मुदत 21 मार्च रोजी संपुष्टात आली. मात्र, ओबीसींचा राजकीय आरक्षणा ( OBC Reservation )संदर्भात याचिका दाखल असल्याने निवडणुका न झाल्याने जिल्हा परिषदेत 4 प्रशासकाची नेमणूक झालेली आहे. दि. 4 मे रोजी झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूक पूर्व तयारीला वेग आला.

राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2022 मध्ये राबवलेला गट-गण प्रारुप आराखडा कार्यक्रम रद्द करत, जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण प्रारुप रचनांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला होता. यात आता गट-गणांचे प्रारुप आराखडे मान्यतेचे अधिकारी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

नवीन वेळापत्रकानुसार गट व गण प्रारुप आराखडा तयार करण्याचे काम 23 मेपासून सुरू होऊन 27 जूनला अंतिम प्रारूप आराखडा प्रसिध्द होईल, असे जाहीर केले आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार सोमवारी (दि.23) जिल्हा प्रशासनाने प्रारूप गट, गण रचना तयार करून विभागीय आयुक्तांना सादर करणे क्रमप्राप्त होते.

मात्र, सोमवारी हा प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासनाकडून सादर होऊ शकला नव्हता.हा प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांकडे बुधवारी (दि.25) सादर झाला आहे.

2 जूननंतर हरकती

विभागीय आयुक्त कार्यालयाने आराखडा प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले आहे. गुरूवार (दि.26)पासून प्राप्त आराखड्याच्या पडताळणीस सुरूवात होईल. साधारण 30 मेपर्यंत ही पडताळणी होऊन 31 मे रोजी तो पुन्हा जिल्हाधिकार्‍यांना सादर होणार आहे. जिल्हाधिकारी दि. 2 जून रोजी प्रसिध्द करतील. त्यानंतर त्यावर हरकती मागविल्या जातील.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *