Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरकोपरगावातील गट-गण रचनेची फेरतपासणी

कोपरगावातील गट-गण रचनेची फेरतपासणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणूका होणार्‍या जिल्ह्यात 2011 च्या लोकसंख्येनुसार विस्तारित गट आणि गणांची रचना करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकार्‍यांना दिले होते. त्यानुसार नगर जिल्ह्यातील कच्ची विस्तारित गट आणि गण रचना करण्यात आली.

- Advertisement -

मात्र, हे करत असताना एकीकडे इच्छुकांची घालमेल तर दुसरीकडे सततच्या चौकशांमुळे अधिकारीही गरगरले आहेत. दरम्यान, काही नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे रचना होण्यासाठी दबाव आणल्याची चर्चा असतानाच कोपरगाव तालुक्यातील रचनेची फेर तपासणी करण्यात येत आहे.

मागील आठवड्यात राज्य निवड निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट आणि गणाची 2011 च्या लोकसंख्येनूसार विस्तारित कच्ची रचना करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानूसार जिल्हा प्रशासन आणि तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्या यंत्रणेने झिकझॅक पध्दतीने गटांची आणि गणांची रचना केली. हे करत असतांना लोकसंख्येनूसार उत्तरेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून दक्षिणकडे झिकझॅक पध्दतीचा अवलंब करण्यात आला. तसेच पुढे दक्षिण बाजूला नवीन गट तयार करण्यात आला.

हे काम करतांना जिल्ह्यात अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी, नेते, जिल्हा परिषद सदस्य, निवडणुकीसाठी इच्छुक असणार्‍यांनी महसूल प्रशासनाला भंडावून सोडल्याची चर्चा आहे. गट कसा होणार, कोणती गावे फुटून दुसर्‍या गटात जावू शकतात. आपल्या गटात कोणीती गावे राहणार, तालुक्यात कोणता नवीन गट तयार होणार, सोईनूसार नवीन गट आणि गण तयार करता येणे शक्य आहे? अशा प्रश्नांच्या उत्तरासह मर्जीनूसार गट, गणाची रचना करण्यासाठी मार्गाने दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. काही ठिकाणी तर आजी आणि माजी लोकप्रतिनिधींनी दबाव आणल्याने अधिकारी गोंधळले. दरम्यान, या रचनेवर नियमानुसार आक्षेप मागवले जाणार आहेत. याची प्रक्रीया लवकरच सुरू होईल. त्यावेळी आक्षेपांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोपरगाव तालुक्यातील गटांची रचना करतांना दक्षिण बाजूच्या मोठ्या गावाचा गट न करता तो पश्चिम बाजूने केल्याबाबत त्रुटी राहिल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे आक्षेप नोंदविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील गटांच्या रचनेची फेरतपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी ‘सार्वमत’शी बोलतांना सांगितले.

जिल्हा महसूल विभागाने तालुकानिहाय तयार केली. 14 पैकी 13 तालुक्यांची कच्ची गट आणि गणांची रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर झाली आहे. मात्र कोपरगाव तालुक्याची गट आणि गण रचनेची फेर तपासणी होत असून त्यात काही त्रुटी आढळल्यास राज्य निवडणूक आयोगाला नव्याने गट आणि गणांची रचना सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

कच्ची रचना काय झाली, याची माहिती घेण्यासाठी अनेक नेत्यांचे प्रतिनिधी महसूल विभागाच्या संपर्कात होते. येथेही सत्ताधारी आणि विरोधक असा सामना रंगला आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी प्रशासनाला हाताशी धरून सोयीची रचना करून घेण्यासाठी दबाव आणला असावा, अशी शंका विरोधी पक्षातील नेत्यांना आहे. त्यामुळे काहींनी या रचनेवर नियमाप्रमाणे आक्षेप घेण्याची तयारी सुरू केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या