Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसभा निर्णयाचा चेंडू अध्यक्षांच्या कोर्टात; जि. प. सभा ऑनलाईन की ऑफलाईन वाद

सभा निर्णयाचा चेंडू अध्यक्षांच्या कोर्टात; जि. प. सभा ऑनलाईन की ऑफलाईन वाद

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा घेण्याबाबत प्रशासन ऑनलाईनवरच ठाम असल्याची चर्चा असताना, प्रशासनाने ऑफलाईन (प्रत्यक्ष सभागृहात)चा चेंडू अध्यक्षांच्या कोर्टात टोलवला आहे. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्याकडून सभेची तारीख व सभा ऑनलाईन की ऑफलाईन हा निर्णय येईल, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

- Advertisement -

दुसरीकडे, सदस्यांपाठोपाठ पदाधिकाऱ्यांनीही ऑनलाईन सभेला तीव्र विरोध दर्शवत सभा सभागृहातच सभा घेण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्याची सदस्यांची मागणी लक्षात घेता पदाधिकाऱ्यांनीही सभा ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घेण्याची तयारी केलेली असताना त्याला मात्र प्रशासनाने खो घातला आहे.

मागील आठवडयात सभेत प्रशासनाची झालेली नामुष्की पुन्हा होऊ नये, तसेच सदस्यांचे प्रश्न टाळण्यासाठी सभा सभागृहात घेण्यास प्रशासनाकडून विरोध केला जात असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात सभा ऑफलाईन घेण्याबाबत कोणताही शासन आदेश नसताना, ऑनलाईन सभेचा प्रशासनाचा अट्टहास का ? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला होता.

असे असतानाही प्रशासन ऑनलाईन सभेवर ठाम आहे. प्रशासनाने करोनाचे कारण पुढे केले असून, कोणी करोना पॉझिटिव्ह निघल्यास कोण जबाबदारी घेणार असा प्रश्न उपस्थित करत पदाधिकाऱ्यांवर प्रशासन जणू दबावच टाकत असल्याची चर्चा आहे.

असे असतानाच ऑफलाईन सभेचा निर्णय अध्यक्षांकडून घेतला जाईल असे सांगितले जात आहे. अध्यक्षांकडून अद्यापही सभेची तारीख तसेच सभा ऑफलाईन की ऑनलाईन हा निर्णय आलेला नसल्याचे प्रशासनाने सांगत, अध्यक्षांकडेच निर्णय सोडला आहे. बहुतांश सदस्यांचा ऑनलाईन सभा घेण्यास विरोध असताना, पदाधिकाऱ्यांनीही उघड विरोध दर्शविला आहे. त्यामुळे अध्यक्ष सभेबाबत नेमका काय निर्णय घेता याकडे आता लक्ष वेधले गेले आहे.

अर्थसंकल्पीय सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्यास कोणतीही हरकत नसून आमची तयारी आहे. मात्र, प्रशासन तयार नाही. प्रशासनाला सभागृहात सभा घेण्याचे सांगितले असता प्रशासन ऐकत नाही. प्रशासन ऑनलाईनसाठी आग्रही आहे.

डॉ. सयाजी गायकवाड (उपाध्यक्ष, जि. प.)

ऑनलाईन सभेसंदर्भात शासनाचे परिपत्रक असल्यास ते दाखविण्यात यावे. अन्यथा सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन सभागृहात सभा घ्यावी. विनाकारण ऑनलाईन सभेचा हट्ट नको.

संजय बनकर (सभापती, जि. प.)

- Advertisment -

ताज्या बातम्या