कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण दगावता कामा नये

नाशिक । प्रतिनिधी

कोव्हीड केअर सेंटरमध्ये कोणत्याही परिस्थितीत रुग्ण मृत्यू होणार नाही याची दक्षता घेत रोज रुग्णाची तपासणी करावी. रुग्णाची तब्येत खालवल्यास त्यास वेळीच ‘डीसीएचसी’मध्ये किंवा ‘डीसीएच’ मध्ये स्थलांतरीत करावे. असे आदेश जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले…

करोना नियंत्रण उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्याशी ग्रामीण व शहरी भागातील संवाद साधला.करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्याने कंटेनमेंट झोन मधील प्रभावी व्यवस्थापन हा संसर्ग रोखण्याचा सर्वात महत्वाचा उपाय आहे.

त्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करणे व त्याला प्रतिसाद न मिळाल्यास राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. राज्य शासनाने नुकतीच जारी केलेली अधिसूचना तसेच जिल्ह्याने यापूर्वी जारी केलेले आदेश याचा व्यवस्थित अभ्यास करून त्याची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर करावी.

सीसीसी,डीसीएचसी यांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होत असल्याचे पहावे. तालुक्यातील सीसीसी, डीसीएचसी या ठिकाणी आवश्यक आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्स नियुक्त आहेत का, वेळेप्रमाणे ते उपस्थित राहणे बंधनकारक असेल.

त्या ठिकाणी आवश्यक सुविधा- जेवण, पाणी, औषधे इत्यादी पुरविल्या जातील याबाबत दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

तसेच शिफ्टनिहाय कर्मचाऱ्यांची नावे, ॲम्ब्युलन्स क्रमांक, वाहनचालकाचे नाव, ‘सीसीसी’ ते ‘डीसीएचसी’ किंवा ‘डीसीएच’ असे प्रवासाचे नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच करोनाचे संकट अधिक गंभीर होत असल्याने, कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *