Thursday, April 25, 2024
Homeनगरझगडेफाटा ते वडगावपान रस्त्याचा मंजूर 187.83 कोटींचा निधी गेला परत

झगडेफाटा ते वडगावपान रस्त्याचा मंजूर 187.83 कोटींचा निधी गेला परत

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तळेगाव मार्गे कोपरगाव संगमनेर रस्त्याच्या भाग असलेला झगडेफाटा ते वडगाव पान या 33 कि.मी.रस्त्यासाठी आशियायी विकास बँकेचा 187.83 कोटींचा निधी मंजूर होऊनही तो परत गेला असल्याची माहिती, माहिती अधिकारात हाती आली आहे. आता याचे श्रेय कोणाचे? असा तिखट सवाल जवळके आणि रांजणगाव देशमुख आदी परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.

- Advertisement -

आशिया व अतिपूर्वेकडील देशांच्या आयोगाने (इकॅफे) बँकेने राज्याचा 30 टक्के हिस्सा व या बँकेचा 70 टक्के निधी देण्याच्या बोलीवर तळेगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा ते संगमनेर तालुक्यातील वडगाव पान फाटा या 33.156 कि.मी.रस्त्यासाठी 187.83 कोटी रुपयांचा निधी सन-2018 साली मंजूर केला होता. त्यासाठी राज्याचा हिस्सा 30 टक्क्याने 56.340 कोटी तर आशियायी विकास बँकेचा हिस्सा 70 टक्क्याने 131.481 कोटी येत होता. मात्र याकडे पुढार्‍यांनी नेहमीप्रमाणे दुष्काळी भागाबाबत आकस दाखवून सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.

त्यासाठी नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंडळ अभियंता जे. डी.कुलकर्णी यांनी दि.25 सप्टेंबर 2020 रोजी पाहणी दौरा करून अहवाल तयार करून प्रकल्प संचालक आशियायी बँक सहाय्यित प्रकल्प तथा मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण मुंबई यांना पाठवला होता. नुकतीच माहिती अधिकारात याबाबत धक्कादायक माहिती हाती आली आहे. तळेगाव दिघे, जवळके, रांजणगाव देशमुख, पोहेगाव आदी ठिकाणी काट छेद होऊन प्रशस्त रस्ते होऊन अपघात कमी होणार होते. मात्र त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले असून वर्तमानात आधी झगडे फाटा ते जवळके पर्यंत दहा कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

तर जवळके ते संगमनेर हद्द भागवतवाडीपर्यंत रस्त्यावर मुरूम टाकून त्यावर डांबरीकरण करण्याचे कामासाठी आणखी 5 कोटी अशा 15 कोटी रुपयांच्या आरत्या ओवळण्याचे काम आ.काळे समर्थकांकडून सुरू आहे. तथापि या रस्त्यासाठी हा मोठा निधी मिळणार असल्याने अन्य निधीची तरतूद करू नये असे आदेश बांधकाम विभाग मुख्य अभियंता नाशिक यांनी अधीक्षक अभियंता अ.नगर यांना काढले होते. त्यामुळे या रस्त्याला तब्बल 5 वर्षे कोणतीही आर्थिक तरतूद झाली नव्हती त्यामुळे या रस्त्यावर चालणे कठीण बनले होते. त्यामुळे धुळे, मालेगाव आदींकडून येणारी अवजड वाहने आणि प्रवाशांना पर्यायी शिर्डी बाह्यवळण रस्त्यामार्गे शिर्डी विमानतळ मार्गाचा वापर करावा लागत होता.

वेळ आणि पैशाचा अपव्यय होत होता व तळेगाव मार्गे अपघातात मोठी वाढ झाली होती त्यात अनेकांना जीवित व वित्तीय हानी सोसावी लागली ती वेगळीच. या रस्त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी अपघात कमी होण्यास मदत मिळणार होती. सदरचा 187.83 निधी परत गेल्याने सगळे मुसळ केरात गेले आहे. या आधीच निळवंडे धरणाचे काम आपल्या मद्य कारखान्यासाठी या मंडळींनी होऊ दिले नाही त्या नंतर रस्त्याचा अन्याय हा सहनशीलतेच्या पलिकडे गेला होता. त्यामुळे पोहेगाव, शहापूर, बहादराबाद, जवळके, धोंडेवाडी, बहादरपूर, अंजनापूर, रांजणगाव देशमुख, काकडी, डांगेवाडी, मनेगाव, चिंचोली, वेस-सोयगाव आदी गावांतील ग्रामस्थांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे.

सदर निधी पुन्हा एकदा पाठपुरावा करून परत आणावा अशी मागणी जनमंगल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव थोरात, गंगाधर रहाणे, बाळासाहेब रहाणे, माजी सरपंच वसंत थोरात, बंडोपंत थोरात, उपसरपंच रामनाथ पाडेकर, नामदेव थोरात, डी.के.थोरात, माजी उपसरपंच विजय थोरात, दत्तात्रय थोरात, रावसाहेब थोरात, कौसर सय्यद, बाबासाहेब गव्हाणे, कैलास गव्हाणे, नरहरी पाचोरे, भाऊसाहेब गव्हाणे, प्रकाश थोरात, बंडोपंत देशमुख, संजय गुंजाळ, नामदेव दिघे, पाटीलभाऊ दिघे आदींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या