Friday, April 26, 2024
Homeनगरनगरमध्ये टोळक्याकडून युवकावर खुनी हल्ला

नगरमध्ये टोळक्याकडून युवकावर खुनी हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

युवकावर रॉड, दांडक्याने मारहाण करत चॉपर व वस्तार्‍याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास रामवाडी परिसरातील यशांजली हॉटेलच्यापुढे घडली होती. अमन युनूस शेख (वय 19 रा. तख्ती दरवाजा, माणिक चौक) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

उपचारादरम्यान त्याने सोमवारी दुपारी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून निखील धंगेकर, रूद्रेश अंबाडे, विशाल जाधव, कृष्णा भागानगरे, गामा भागानगरे, शिवम घोलप, अक्षय, बंटी साबळे व त्यांच्यासोबतचे इतर अनोळखी 10 ते 15 इसम (सर्व रा. रामवाडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अमन शेख रविवारी रात्री त्याच्या दुचाकीवरून रामवाडी येथील ऍबेट पेट्रोल पंपावर आला व तेथे त्याने दुचाकीत पेट्रोल भरले. पुढे तो गोविंदपुराकडे जात असताना यशांजली हॉटेलच्यापुढे निखील धंगेकर व रूद्रेश अंबाडे यांनी त्यांची दुचाकी त्याला आडवी लावली.

तेवढ्यात तेथे विशाल जाधव, कृष्णा भागानगरे, गामा भागानगरे, शिवम घोलप, अक्षय, बंटी साबळे व इतर अनोळखी 10 ते 15 जण आले. निखीलने हातातील चॉपरने अमनच्या गळ्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला, परंतु त्याने तो वार चुकविला. त्यानंतर निखीलने छातीवर, रूद्रेशने डोक्यावर वार केले. विशालने हातातील गमच्या अमनच्या गळ्याभोवती आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी अनोळखी व्यक्तीने वस्तार्‍याने वार केले. इतरांनी रॉड, दांडक्याने हल्ला करून जखमी केले. ‘तू पोलिसांत कम्प्लेंट केली तर कुणाल भंडारी व बंटी डापसे हे तुला सोडणार नाहीत’, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ करीत आहेत.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

नगर शहरात आणि ग्रामीण भागात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रभावीपणे गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करावा, अशी सामान्य नगरकरांची मागणी असून लवकरच अशा गंभीर स्वरूपाच्या घटनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा, अशी मागणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या