Thursday, April 25, 2024
Homeनगरकोर्टाच्या आवारात पेटवून घेणार्‍या राहुरीतील युवकाचा मृत्यू

कोर्टाच्या आवारात पेटवून घेणार्‍या राहुरीतील युवकाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने समाजात बदनामी झाली. त्यातून मानसिक त्रास झाल्याने राहुरी तालुक्यातील युवकाने नगरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वतःला पेटून घेत आत्महत्येचा प्रयत्न बुधवारी (दि.18) केला होता. ऋषिकेश विठ्ठल डव्हाण (वय 18 रा. बाभुळगाव ता. राहुरी) असे पेटून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी (दि.18) सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisement -

पेटून घेतल्यामुळे ऋषिकेश सुमारे 75 टक्के भाजला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथील ससून रूग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार दरम्यान या युवकाचा मृत्यू झाला.

14 मे रोजी राहुरी तालुक्यातील बाभूळगाव येथे दोन गटात वाद झाले होते. या प्रकरणी 15 मे रोजी राहुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या. एका 34 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेशसह तिघांविरूध्द विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल आहे. तर हनुमान पिल्लाजी डव्हाण यांच्या फिर्यादीवरून दुसर्‍या गटाच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. ऋषिकेशवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची समाजात बदनामी झाली. याचा मानसिक त्याला मानसिक त्रास झाल्याने तो व्यथित होता.

दाखल गुन्ह्याची माहिती घेण्याच्या उद्देशाने तो न्यायालयात आला असल्याचे त्याने दिलेल्या जबाबात म्हटले होते. त्याने पार्किंग केलेल्या स्वत:च्या दुचाकीतून बाटलीमध्ये पेट्रोल काढले. पेट्रोल स्वत:च्या अंगावर ओतून घेतले. खिशातील आगपेटी काढून स्वत:ला पेटून घेतले होते. तरुणाने पेटून घेतल्याचे कळताच एकच धावपळ उडाली होती. पेटलेल्या तरुणाला माती टाकून विझविण्याचा प्रयत्न झाला. यात तो 75 टक्के भाजला गेला असल्याची माहिती डॉक्टारांनी दिली होती. तरुण पेटल्याची माहिती मिळताच न्यायालय परिसरात बंदोबस्तावर असलेले पोलीस, भिंगार कॅम्प, कोतवाली यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा शासकीय रूग्णालयातून रूग्णवाहिका मागविली. ऋषिकेशला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तेथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रूग्णालयात दाखल केले होते. तेथेच त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या