Wednesday, May 8, 2024
Homeब्लॉग१९ वर्षांनी योग : चैत्र शुक्ल प्रतिपदा = १ सौर चैत्र

१९ वर्षांनी योग : चैत्र शुक्ल प्रतिपदा = १ सौर चैत्र

विनय जोशी

चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा( Gudhipadwa) हा भारतात प्रचलित अनेक कालगणनांपैकी काही पंचांगांचा आरंभ दिन आहे.तर १ सौर चैत्र (२१/२२ मार्च) हा भारताच्या अधिकृत दिनदर्शिकेचा- राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचा आरंभ दिन आहे.

- Advertisement -

भाषा,वेशभूषा,खानपान यांच्याप्रमाणे भारतात कालगणनेत देखील मोठी विविधता आहे.शुद्ध सौर /चांद्र-सौर ,सायन /निरयन, अमांत /पौर्णिमांत असे अनेक प्रकार भारतात प्रचलित आहेत.त्यांचे वर्षारंभ दिन सुद्धा वेगवेगळे आहेत.शुद्ध सौर पंचागातून आकाशाची माहिती मिळत नाही तर शुद्ध चांद्र पंचांगांचा ऋतूंशी ताळमेळ उरत नाही. बहुतांश भारतीय कालगणनेत या दोघांचा सुवर्णमध्य काढत चांद्र-सौर पंचांग वापरले जाते

महाराष्ट्र ,कर्नाटक राज्यात शालिवाहन संवत आणि बहुतांश उत्तर भारतात चैत्रादी विक्रम संवत प्रचलित आहे. ह्या दोन्ही चांद्र-सौर कालगणना असून त्यांचा वर्षारंभ चैत्र प्रतिपदेला होतो.या कालगणनेत चंद्राच्या प्रतिपदा द्वितीया ,तृतीया अशा तिथींवर आधारित २९.५ दिवसांचे चांद्र महिने असतात. त्यामुळे वर्षाचे ३५४ दिवस होतात.पण विशिष्ट कालावधीनंतर अधिक महिना घेऊन पुन्हा सौर पंचागांशी जुळवून घेतले जाते. धार्मिक कार्यांसाठी ,सणवार उत्सवांसाठी ही कालगणना वापरली जाते. २२ मार्च २०२३ ला चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून शक संवत १९४५ आणि विक्रम संवत २०८० सुरु होत आहे.

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका असून २२ मार्च १९५७ पासून अधिकृतपणे स्वीकारली आहे.सरकारचे सर्व कामकाज,बातम्या,राजपत्र,संसदेचे कामकाज यात हिचा वापर केला जातो.राष्ट्रीय सौर दिनांक चेकवर लिहिणे ग्राह्य आहे. हि शुद्ध सौर कालगणना असून एका वर्षात ३६५. २४ दिवस असतात. यातले १२ महिने सौर म्हणजे सूर्यावर आधारित असून त्यांची नावे मात्र चैत्र,वैशाख हीच आहेत(फक्त मार्गशीर्ष चे नाव आग्रहायण आहे ).पण यात तिथी नसून १ ते ३१ अंकांनी दिवस मोजले जातात.नवीन वर्षाची सुरवात १ सौर चैत्र म्हणजे २२ मार्चला (लिपवर्षात २१ मार्च )होते.२२ मार्च २०२३ ला १ चैत्र १९४५ सुरु होत आहे.

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही संपूर्णपणे खगोलशास्त्रावर आधारित कालगणना आहे.नवीन वर्षाची सुरवात भारतीय सौर १ चैत्र वसंत संपात दिनी म्हणजे २२ मार्चला होते.या दिवशी दिवस आणि रात्र समान असतात.या नंतर तीन महिन्यांनी सौर १ आषाढ- २२ जूनला सूर्य कर्कवृत्तावर दिसत असताना दक्षिणायन सुरु होते.पुढे २३ सप्टेंबरला शरद संपात दिनी सहा महिने पूर्ण होऊन सौर १ अश्विन येतो.या वेळी पुन्हा दिवस-रात्र समान असतात.तर २२ डिसेंबरला सूर्य मकर वृत्तावर असताना नऊ महिने पूर्ण होऊन सौर १ पौष येतो.अशा प्रकारे दर तिमाहीची सुरुवात निसर्गातील या चार महत्त्वपूर्ण खगोलीय घटनांशी सांगड घालणारी आहे.

राष्ट्रीय दिनदर्शिका शुद्ध सौर असल्याने त्यात वर्षारंभ दिन नेहमी २२ मार्चला(लिपवर्षात २१ मार्च ) येतो. शालिवाहन/विक्रम संवत चांद्र-सौर असल्याने चैत्र शु प्रतिपदा नेहमी एकाच तारखेला येत नाही.पण दर १९ वर्षांनी चंद्राची तिथी पुन्हा त्याच दिनांकावर येते .याला मेटॉनिक चक्र म्हटले जाते.दर १९ सौर वर्षांनी ३६५. २४ X १९ = ६९३९.६ दिवस पूर्ण होतात.तर याच कालावधीत चांद्र वर्षाचे २३५ महिने म्हणजेच ६९३९.६ दिवस पूर्ण होतात.आणि चंद्राची विशिष्ट तिथी आणि दिनांक पुन्हा एका दिवशी येतात.यावर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा आणि १ सौर चैत्र हे एकाच दिवशी आले आहेत. या नंतर १९ वर्षांनी २०४२ मध्ये हा योग पुन्हा येईल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

खरतर राष्ट्रीय दिनदर्शिका ही जगातली सगळ्यात शास्त्रीय आणि निसर्गचक्राशी पूरक दिनदर्शिका आहे.तसेच तिरंगा, राष्ट्रगीत यांच्यासारखीच आपले राष्ट्रीय प्रतिक आहे.पण भारतीय असून आपल्याला याबद्दल फारशी माहिती नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.दैनंदिन व्यवहारात या दिनदर्शिकेचा प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत.ही दिनदर्शिका घरात लावणे ,जिथे जिथे इंग्रजी तारीख लिहितो तिथे सौर दिनांक सुद्धा लिहिणे,चेक,निमंत्रण ,लग्नपत्रिका वैगरे सगळ्या दैनंदिन व्यवहारात वापर करणे अशा सोप्या उपायातून हे कार्य घडू शकेल.असा प्रयत्नांतून भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका जनमानसात रुजावी याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

- Advertisment -

ताज्या बातम्या