Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याAPMC Election 2023 : येवल्यात भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलची बाजार समितीवर...

APMC Election 2023 : येवल्यात भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलची बाजार समितीवर सत्ता

येवला । प्रतिनिधी Yeola

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर, संभाजीराजे पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने १३ जागांवर विजय मिळवीत दणदणीत विजय मिळवला आहे. आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे बंधू आणि अ‍ॅ‍ॅड माणिकराव शिंदे यांच्या शेतकरी समर्थक पॅनलला अवघ्या तीन तर अपक्ष दोन जागांवर समाधान मानावे लागले. शेतकरी समर्थक पॅनलचे जे तीन उमेदवार निवडून आले, त्यांचे स्वतःचे वैयक्तिक हिमतीवरील कष्ट उपयोगी ठरले. विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी केली.

- Advertisement -

येवला – मनमाड राज्य महामार्गावरील सिद्धार्थ लॉन्सवर सकाळी ८ वाजता निवडणूक निरीक्षक तथा प्रांताधिकारी ज्योती कावरे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आबा महाजन, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय बोरसे, निवासी नायब तहसीलदार पंकज मगर, पुरवठा अधिकारी बाळासाहेब हावळे यांच्या सह सहकार विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. प्रथम हमाल मापारी व व्यापारी गटाची मतमोजणी करण्यात आली. पाऊण तासातच एका जागेसाठी १० उमेदवार नशीब आजमावत असलेल्या हमाल मापारी गटाचा पहिला निकाल घोषित करण्यात आला. या गटातुन अपक्ष उमेदवार अर्जुन बबन ढमाले हे १०४ मते मिळवत विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार वसंत झांबरे यांचा (७६) २८ मतांनी पराभव केला.

व्यापारी गटात शेतकरी विकास पॅनेलचे नंदकिशोर अट्टल (३०१ मते) तर अपक्ष उमेदवार (२५० मते ) हे विजयी झाले. ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण दोन जागांवर शेतकरी समर्थक पॅनेलचे महेश काळे हे ५४१ मते घेऊन तर शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार तथा संभाजीराजे पवार यांचे खन्दे समर्थक ऍड बापू वामन गायकवाड हे ४३२ मते घेत विजयी झाले. ग्रामपंचायत गटाच्या आर्थिक दुर्बल जागेवर शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार पारेगावचे सरपंच सचिन आहेर यांनी ५५९ मते घेत विजय प्राप्त केला तर अनुसूचित जाती जमाती जागेवर संध्या बापू पगारे यांनी ४२५ मते घेत विजय मिळवला. या गटात शेतकरी समर्थक पॅनेलचे गुड्डू जावळे यांचा ९७ मतांनी पराभव केला.

सोसायटी गटातील महिला राखीव जागेवर शेतकरी समर्थक पॅनेलच्या उमेदवार माजी सभापती उषाताई माणिकराव शिंदे (६५६ मते) तर शेतकरी विकास पॅनेलच्या लता भास्कर गायकवाड (४९७ मते) विजयी झाल्या. सोसायटी गटातील भटके विमुक्त जागेवर शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार कांतीलाल साळवे यांनी ५७५ मते घेत शेतकरी समर्थक पॅनेलचे उमेदवार नारायण आव्हाड (२५३) यांचा ३२२ मतांनी पराभव केला. सोसायटी गटातील इतर मागास प्रवर्ग गटात शेतकरी विकास पॅनेलचे वसंत पवार (५९६) यांनी शेतकरी समर्थक पॅनेलचे उमेदवार हरिभाऊ महाजन (३७३) यांचा २२३ मतांनी पराभव केला. सोसायटी गटाच्या सर्वसाधारण जागेवर शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार सविता पवार (७२६), संजय बनकर (७०५), रतन बोरणारे (६०९), शेतकरी समर्थक पॅनेलचे उमेदवार भास्कर कोंढरे (५३५), शेतकरी विकास पॅनेलचे किसन धनगे (५०१ ), अलकेश कासलीवाल (४९१) हे विजयी झाले.

शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार संजय पगार हे ४७१ मते मिळवत सर्वसाधारण सातव्या जागेवर विजयी झाल्याचे घोषित करण्यात आल्यानंतर, याच पॅनेलचे दोन मतांनी पिछाडीवर असलेले उमेदवार मोहन शेलार यांनी पावणे दोन वाजता फेरमतमोजणीचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी आबा महाजन यांच्याकडे दिल्यानंतर फेरमतमोजनी घेण्यात आली. या मतमोजणीत दोघांनाही १ मत वाढले, मात्र फरक २ मतांचा कायम राहिला. पुन्हा शेलार यांनी बाद मत पत्रिकांची तपासणी करण्याची विनंती केली. अन बाद मतपत्रिकेवरून शंका उपस्थित केल्या. मात्र सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पगार यांना शेलार यांच्यापेक्षा१ मत जास्त असल्याचे घोषित करून सोसायटी गटाचा निकाल घोषित करण्यात आला.

भुजबळांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलची धुरा माजी आमदार मारोतीराव पवार, जेष्ठ नेते अंबादास बनकर, युवा नेते संभाजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, बाळासाहेब लोखंडे यांनी सांभाळली. त्यामुळेच या पॅनेलला एकहाती सत्ता बाजार समितीवर प्राप्त करता आली. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात चुरस निर्माण झाली होती, मात्र ही चुरस मतात वर्ग झाल्याचे दिसून आले नाही. यावेळी शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या