Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्याचांगल्या - वाईट अनुभवांचे वर्ष

चांगल्या – वाईट अनुभवांचे वर्ष

नाशिक | प्रतिनिधी Nashik

2021 मध्ये बहुचर्चीत शहर बससेवा नाशिक महापालिकेने NMC Bus Services प्रत्यक्षात सुरू केली. मनपा तोटा सहन करीत अत्यंत माफक दरात दर्जेदार सेवा यामाध्यमातून नाशिककर प्रवाशांना देत आहे. यामुळे शहर विकासात भर पडली. तर भूखंड बीओटी तत्वावर देण्यावरुन व टीडीआर घोटाळ्यामुळे TDR Scam सत्ताधार्‍यांवर झालेले आरोप अशा काही चांगल्या तर काही वाईट अनुभव महापालिकेत वषभरात आले.

- Advertisement -

नाशिक महापालिका म्हटले की वादविवाद, घोटाळे व आरोपांच्या फैरी हेच समोर येते. याच पध्दतीने 2021 हे वर्ष देखील गाजले. भाजप नगरसेवक जगदीश पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा टीडीआर घोटाळा समोर आणला, त्यासाठी मनपा आयुक्तांनी स्वतंत्र चौकशी समिती गठीत केली असून चौकशी प्रत्यक्ष सुरू देखील झाली आहे. त्याचप्रमाणे महापौर सतिष कुलकर्णी Mayor Satish Kulkarni यांच्या काही निर्णयांना विरोध करीत शिवसेनासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आदींनी विविध आरोप करुन वाद निर्माण केला.

2017 च्या निवडणूक प्रचार सभेत तत्कालीन भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचा दत्तक घेण्याचे जाहीर केले होते.यानंतर विविध कारणांनी सत्ताधार्‍यांवर विरोधकांनी आरोप करतांना दत्तक विधानाचा सतत समाचार घेतला.

8जुलै 2021 रोजी मनपातील सत्ताधारी भाजपने दिलेला शब्द पुर्ण करीत नाशिक शहरात बस सेवा सुरू केली.

सुरुवातीला 50 बसेस धावल्या तर टप्याटप्याने त्यात वाढ करण्यात येऊन सध्या दिडशे बसेस रस्त्यावर धावत आहे.

करोनामुळे मनपाच्या विविध विकास कामांवर परिणाम झाला.

अधिकारी व सेवकांच्या कमी उपस्थितीत मनपाचा कारभार या काळात सुरू होता.

करोनाची दुसरी लाट भयंकर ठरली. यामुळे ऑक्सीजन पुरवठासह आरोग्य यंत्रणा चर्चेत राहिल्या.

या काळात मनपाच्या माध्यमातून ठक्कर डोमसह अनेक ठिकाणी लहान- मोठे कोविड सेंटरची उभारणी करुन लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात आली.

मनपा आयुक्तांनी प्रत्येक नगरसेवकाच्या निधीतून प्रत्येकी 10 ऑक्सिजन मशिन खरेदी करण्यास मान्यता दिली.यानंतर नगरसेवकांनी त्याचे मोफत वाटप नागरिकांमध्ये केले होते.

याकाळात रेमडिसेव्हर इंजेक्शनसाठी देखील मोठी मारामार झाली.

जानेवारीपासून शहरात लसीकरण केंद्र सुरू झाले.सुरुवातीला लस घेण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने काही ठिकाणी मनपाचे नियोजन चुकले.नंतर हळूहळू मात्र परिस्थिती नियंत्रणात आली.

एप्रिल महिन्याच्या 21 तारखेला मनपाच्या जुने नाशिक येथील डॉ. जाकीर हुसैन रुग्णालयात गॅस गळतीची मोठी दुर्घटना घडली.यामध्ये सुमारे 22 रुग्ण दगावले. तर लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले.

ज्या काळात ऑक्सीजन बेड मिळत नव्हते त्या काळाच दुर्घटना घडल्याने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आली.

या दुर्घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांनी ट्वीट केले होते.यानंतर या संपुर्ण घटनेची चौकशीचे आदेश देण्यात आले.

दोन महिन्यांपूर्वीच चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबधित ठेकेदारावर आर्थिक दंडासह इतर कारवाई करण्यात आली.

महापौर सतीश कुलकर्णी यांच्या विशेष प्रयत्नांनी जलनिती ही आरोग्य पध्दतीचे धडे लोकांना देण्यात आले.याबाबतची पुस्तिका तयार करुन लाखो कॉपी वाटप करण्यात आले.

शहरातील मोक्याच्या मनपाच्या मालकीच्या भुखंड बीओटी तत्वावर देण्याचा निर्णय महापौर सतिश कुलकर्णी यांनी घेतला.यावर विरोधकांनी विविध आरोप करीत मनपाच्या मोक्याच्या जागा बिल्डरांच्या घशात भाजप घालत असल्याचा आरोप केला. विरोध न जुमानता सत्ताधार्‍यांनी शहर विकासासाठी निर्णय मागे न घेता पुढील कारवाई सुरू केली आहे.

मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या अनुकंपा नोकर भरतीचा विषय यावर्षी मार्गी लागला. माजी आ. वसंत गिते, विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांच्यासह सेनेच्या इतर नेत्यांनी हा विषय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत नेला होता.सुमारे 192 जणांना मनपात यामुळे नोकरी मिळाली.

पदोन्नतीचा विषय देखील अनेक वर्षापासून प्रलंबीत होता. शिवसेना प्रणित मनपा कामगार सेना अध्यक्ष नगरसेवक प्रविण तिदमे यांनी हा विषय लावून धरला होता.यानंतर सुमारे 500 मनपा सेवकांना मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी पदोन्नती दिली.

नमामी गंगेच्या धर्तीवर धार्मिक नगरी असलेल्या नाशिकमध्ये नमामी गोदा प्रकल्प राबविण्याची मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केंद्र सरकारकडे केली. यासाठी भाजप पदाधिकारी व मनपा अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने दिल्ली वारी करुन तिकडे प्रेझेंटेशन दिले.महापौरांच्या पाठपुराव्याला यश मिळाले व 1823 कोटी रुपयांचा निधी नमामी गोदासाठी केंद्राने मंजूर केला.

केंद्र सरकाराच्या सहकार्याने विशेष बाब म्हणून नाशिकमध्ये भव्य आयटी हब देखील होणार आहे.

अपक्ष नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश करायचा होता.

नवीन नाशिक येथे मनपाकडून बांधण्यात येणार्‍या उड्डाणपुलावरुन आरोप -प्रत्यारोप झाले.

स्मार्ट सिटी कंपनीच्या मनमानी कारभाराविरुध्द विशेष महासभा घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले प्रकाश थविल यांना परत पाठविण्याचा प्रस्ताव मंजूर झाला.यानंतर राज्याचे मुख्य सचिव तथा स्मार्ट सिटी अध्यक्ष कुंटे यांनी नाशिकमध्ये विशेष आढावा बैठक घेतली व थवील यांची बदली करुन सुमंत मोरे यांची नेमणूक करण्यात आली.

प्राचीन काळापासून सुरु असलेल्या गरुड रथाचा मार्ग स्मार्ट सिटीच्या कामामुळे कमी झाला आहे.यामुळे शिवसेना पदाधिकार्‍यांनी पाहणी करुन दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली.

मागील सुमारे 24 वर्षापासून नाशिक मनपात नोकर भरती झालेली नाही.यामुळे सध्या असलेल्या अधिकारी व सेवकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. तर शहरवासियांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळत नसल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन मानधनावर नोकर भरतीसाठी विशेष महासभा घेतली.किरकोळ विरोध वगळता मानधनावर नोकर भरतीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.सध्या तो प्रशासनाकडे असून याबाबत अंतीम निर्णय मनपा आयुक्त घेणार आहेत.

2022 च्या सुरुवातीला नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.सध्या चार सदस्यीय प्रभाग पध्दत असली तरी सुरूवातीला शासनाने ती रद्द करुन ती एक सदस्यीय करण्याचा निर्णय घेतला होता.त्यात बदल करुन दोन सदस्यी झाले व नंतर तीन सदस्यी प्रभाग पध्दतीने निवडणूक घेण्याचा निर्णय झाला.

यंदा 11 नगरसेवक संख्या वाढविण्यात आल्याने 122 वरुन मनपात आता 133 नगरसेवक निवडून जाणार आहे.यानुसार मनपा प्रशासनाने 43 प्रभाग 3 सदस्यीय व एक चार सदस्यीय प्रभाग रचना तयार करुन आयोगाला दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या