मुक्त विद्यापीठाने गरजाधिष्टीतशिक्षण देण्याची गरज

शिक्षणाच्या प्रवाहातून सामाजिक, आर्थिक आणि इतर अनुषंगिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या समुदायासाठी उत्तम पर्याय म्हणजे मुक्त आणि दूरस्थ शिक्षण. समाजातल्या तळागाळातील उपेक्षित-अभावग्रस्त-गरीब घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य नाशिकस्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गेल्या तीन दशकांपासून करत आहेत. आजवर लाखो लोकांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्ण करून व्यवसायिक नि कौटुंबिक जीवनात यश संपादन केलं आहे. शिक्षण घेण्यासाठी गरजेची असलेली मानसिक क्षमता असूनही शिक्षणाची संधी हुकलेल्या घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे आव्हान मुक्त विद्यापीठासमोर होते आणि आहेही. गेल्या तीन दशकांत हे आव्हान पेलण्यात विद्यापीठाला काही प्रमाणात यश आलेलं आहे हे नक्की. काम करताकरता शिक्षण आणि शिक्षण घेता घेता कामात कौशल्य विकसित करणारी प्रणाली हे मुक्त शिक्षणाचे वैशिष्ट्य. पारंपरिक शिक्षणापासून दुरावलेल्या मोठ्या जनसमूहाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य मुक्त विद्यापीठ अविरतपणे करत आहे. यात समाजिकदृष्ट्या वंचित-पिडीत-कष्टकरी-शेतकरी-अल्पसंख्याक आणि स्त्रिया यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यापीठाच्या कृषी शिक्षणक्रमांचा लाभ घेऊन अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवे प्रयोग करत आहेत.

मुक्त विद्यापीठाने सामाजिकशास्त्रे आणि मानव्यविद्या शाखेच्या विविध विषयांची (अर्थशास्त्र-राज्यशास्त्र-इतिहास- समाजशास्त्र-पत्रकारिता-ग्रंथालय व माहितीशास्त्र-उपयोजित कला-मराठी-हिंदी-इंग्रजी साहित्य) विकसित केलेली अत्यंत दर्जेदार अध्ययन सामग्री अनेक जाणकारांनी अन् तज्ज्ञांनी वाखाणली आहे. याचा अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केले आहे आणि करतही आहेत. तसेच आतापर्यंत हजारो प्राथमिक शिक्षकांनी विद्यापीठाची शिक्षणशास्त्राची पदवी मिळवून आपल्या शैक्षणिक वाटचालीत पदोन्नतीचे लाभ घेतले आहेत.

मातृभाषेतून शिक्षणात मोठा वाटा…

मुक्त विद्यापीठाची स्थापना करताना मातृभाषेतून उत्तम आणि दर्जेदार उच्च शिक्षण देणे हा देखील महत्वाचा उद्देश होता. यातही विद्यापीठाने लक्षणीय कामगिरी केली आहे असे म्हणता येते. विज्ञान, तंत्रज्ञान, संगणकशास्त्र व व्यवस्थापन वगळता बाकी विद्याशाखेचे शिक्षण माध्यम मराठीच आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाला commonwealth of learning चा उत्कृष्ट शैक्षणिक संस्थेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोनदा मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे आपले भारतातले एकमेव मुक्त विद्यापीठ आहे. ही बाब तमाम मराठी जनतेसाठी भूषणावह आहे यात शंका नाही.

भविष्यासाठी अमुलाग्र बदल अपेक्षित

‘आयुष्यभरासाठी शिक्षण’ हे मुक्त विद्यापीठाचे अजून एक वैशिष्ट्य. याला अनुसरून भविष्यात अनेक शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम विद्यापीठाला विकसित करावे लागणार आहेत. येत्या दशकात आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल अपेक्षित आहेत. विशेषत: information communication technology, digital platforms, web base teaching and learning, online learning-teaching-assessment-evaluation या नव तंत्रज्ञानाचा स्वीकार नि अवलंब करण्याशिवाय पर्याय नाहीये. मुक्त विद्यापीठाने काळाची पाऊले आधीच ओळखून या दिशेने २०११ नंतर म्हणजे मागील दशकाच्या प्रारंभी सुरुवात केली आहे. आपल्या राज्यात online प्रवेश प्रक्रिया राबवणारे आणि मूल्यमापन करणारे मुक्त विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ आहे असे अभिमानाने नमूद करावेसे वाटते. तसेच करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर online परीक्षा उत्तमपणे आणि यशस्वीरीत्या पार पडणारे हे एकमेव विद्यापीठ आहे. म्हणजे विद्यापीठ तंत्रस्नेही झाले असल्याचे स्पष्ट होते. विद्यापीठाची बहुतांशी अभ्यासकेंद्रे ही पारंपारिक विद्यापीठांना संलग्न महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहेत. करोना साथीच्या काळात ह्या व इतरही अभ्यासकेंद्रांनी online counseling (online समंत्रण) करून विद्यापीठ techno savvy असल्याचा प्रत्यय आणून देत ज्ञानगंगेचा प्रवाह खंडीत होऊ दिला नाही.

या शिक्षणक्रमाचा विकास हवा

येत्या दशकात मुक्त विद्यापीठाने खालील घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या गरजा काय आहेत (need assessment) याचा अभ्यास करून शिक्षणक्रमविकसित करायला हवेत.

१. युवक – दहावी-बारावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण युवकांसाठी विविध कौशल्ये शिकवणारे शिक्षणक्रम तयार करणे. यामध्ये सध्या ITI मध्ये उपलब्ध असलेल्या ट्रेडस शिवाय इतर काय देता येईल याचा विचार व्हावा. शिवाय सध्या उपलब्ध प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी यात कालानुरूप बदल करून त्यांचे अद्यावतीकरण करता येईल. उदा. संविधान साक्षरता-समाज माध्यमांचा विवेकी वापर-लिंगभाव संवेदनशीलता या सारख्या घटकांचा समावेश करता येईल. विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले अध्यासनाने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने ‘लिंगभाव संवेदनशीलता’ यावर अभ्यासक्रम तयार केला असून तो लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे.

२. शासकीय कर्मचारी/अधिकारी – शासनाच्या सेवेत असलेले कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी देखील त्यांच्या गरजांनुसार छोटे अभ्यासक्रम विकसित करता येतील. शासकीय अधिकारी /कर्मचारी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सेवेत आलेले असतात, हे खरे आहे. शिवाय त्यांना नियुक्तीनंतर प्रशिक्षण देखील दिले जाते. पण तरीही त्यांच्यासाठी विशिष्ट विषयाचे उद्बोधन करण्यासाठी शिक्षणक्रम विकसित करता येऊ शकतात. उदा. ग्रामसेवक,तलाठी, विविध विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी, अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षक आणि इतरांचाही समावेश करता येईल.

३. व्यावसायिक – विविध क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक, कलावंत, माध्यमकर्मी, NGOs मधील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, वकील, लेखापाल, event mangers, सेवा क्षेत्रातील कर्मचारी, लहान उद्योजक, आदरातिथ्य व्यवस्थापनातील कर्मचारी, खाजगी रेडीओवरील कर्मचारी इत्यादी समूहासाठी त्यांच्या गरजा विचारात घेऊन त्यांच्या कौशल्ये वृद्धीसाठी शिक्षणक्रम विकसित करता येऊ शकतात. वरील तिन्ही समूहातल्या स्त्रियांच्या गरजांकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

महाराष्ट्रचे ‘लोकविद्यापीठ’

बदलत्या काळात २०-२५ वर्षांपूर्वी घेतलेल्या शिक्षणावर उर्वरित करिअर करता येणार नाहीये. त्यासाठी प्रत्येकाला वेळोवेळी काही नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे आता शिक्षणाचे विशिष्ट वय असते ही धारणा बदलावी लागणार आहे. अशा समूहाला शिक्षित करण्यासाठी मुक्त विद्यापीठाशिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही. फक्त अशा समूहासाठी शिक्षणक्रम विकसित करताना ‘प्रौढ/अनुभवी लोकं कसे शिकतात?’ या बाबतचे विविध सिद्धांत नि अभ्यास ध्यानात घ्यावे लागतील. त्या आधी वरील समूहाच्या शिक्षणाच्या नेमक्या गरजा काय आहेत याचं शास्त्रशुद्ध आकलन होणे फार महत्वाचे आहे. येत्या दशकात सर्व प्रकारच्या समूहासाठी घरी राहून, काम करता करता, व्यवसाय नोकरी करता करता शिक्षण घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जनमानसात प्रस्थापित व्हावे अशी अपेक्षा. म्हणजे खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्रचे ‘लोकविद्यापीठ’ म्हणून नावाजले जाईल.

:डॉ. प्रवीण घोडेस्वार

(लेखक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक असून लेखात व्यक्त केलेले विचार वैयक्तिक आहेत.)


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *