Saturday, April 27, 2024
Homeनगरनिवेदनाची दखल घेतली असती तर शिर्डीसह उपनगर जलमय झाले नसते - कोते

निवेदनाची दखल घेतली असती तर शिर्डीसह उपनगर जलमय झाले नसते – कोते

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरासह उपनगरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून यात उपनगरातील घरे, रस्ते, शेतकर्‍यांची पिके जलमय झाले. शेतकर्‍यांनी मागील वर्षीच याबाबत उपविभागीय अधिकारी, शिर्डी नगरपंचायतला निवेदन दिले होते. त्याची दखल घेतली असती तर आज ही परिस्थिती आली नसती, असे मत यादवराव कोते यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

कोते यांनी सांगितले, नांदुर्खी शिवरस्ता करण्याबाबत व त्या रस्त्याच्या बाजूने पाणी जाण्यासाठी चर करण्याबाबत शिर्डीतील शेतकर्‍यांनी निवेदन दिले होते. या निवेदनात नांदुर्खी पाटावरून जे पावसाळ्यात पाणी येते, ते पूर्ण पाणी शिर्डीत साठवण होते. त्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांचे नुकसान होते. आणि हे पाणी दोन ते चार महिने चालूच असते. तसेच हे पाणी शिर्डी शहरातील 200 रुम, द्वारावती भक्तनिवास व इतर उपनगरात जमा होते. यामुळे पाणी साचून गटारीचे प्रमाण वाढून तेथे दुर्गंधी पसरते. या सर्व परिस्थितीमुळे आजाराचे प्रमाण वाढते. लहान मुलांसह नागरिक आजारी पडतात. तर जनावरे मृत होतात. तरी हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा ग्रामस्थ उपोषणास बसू, असे निवेदन देण्यात आले होते.

निवेदनावर यादवराव कोते, विनायक कोते, शरद कोते, शुक्लेश्वर कोते, राजेंद्र कोते, विजय कोते, नारायण कोते, अशोक कोते, सोपान कोते आदींसह शेतकर्‍यांच्या सह्या आहेत. आता पुन्हा शिर्डी प्रांताधिकारी यांच्यासह विविध खात्यातील अधिकारी निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात कशी करायची? याची शोधाशोध व पर्याय काढत असून शेतकर्‍यांच्या गाठीभेटी घेत आहेत. मात्र, जर वर्षापूर्वीच हा प्रश्न गांभीर्याने घेऊन सोडविला असता तर आज शेतकर्‍यांची लाखो रुपयांची पिके तसेच शिर्डी शहर जलमय झाले नसते, असे यादवराव कोते व शेतकर्‍यांनी स्पष्ट केले आहे. आतातरी या परिस्थितीस कारणीभूत ठरत असलेल्या समस्या तात्काळ दूर कराव्यात, अशी मागणी शिर्डीतील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे. जर निवेदनाची योग्य दखल घेतली असती तर आज शिर्डीसह उपनगरात पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली नसती,असे कोते यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या