Thursday, April 25, 2024
Homeनगरलेखी आश्वासनानंतर भाजपाचे उपोषण मागे

लेखी आश्वासनानंतर भाजपाचे उपोषण मागे

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

येथील अमरधाम स्मशानभूमीच्या कामाबाबत शहर अभियंतामार्फत चौकशी केली जाईल, असे लेखी आश्वासन मुख्याधिकार्‍यांनी दिल्यानंतर भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्यावतीने संगमनेर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले साखळी उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले.

- Advertisement -

संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून अमरधामच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे. या कामाच्या निविदा निघाल्याने भारतीय जनता पक्षाने याबाबत आवाज उठविला होता. या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून याची चौकशी व्हावी, या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले होते. स्मशानभूमीच्या कामाचे पहिल्या टेंडरमध्येच सर्व काम पूर्ण होणे अपेक्षित असताना दुसरे टेंडर कशाला काढण्यात आले? असा सवाल भाजपच्या नेत्यांनी विचारला.

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांनी स्मशानभूमीच्या कामाचा पंचनामा करण्याची मागणी केली. याप्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे यांनी सत्ताधार्‍यांवर तीव्र शब्दाळत टीका केली. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी योगेश वाघ यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘गली गली में शोर है, नगरपालिका चोर है’, सत्ताधार्‍यांचा निषेध असो, अशा घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या अधिकार्‍यांना यावेळी चांगलेच फैलावर घेतले.

याप्रसंगी नगरसेविका सौ. मेघाताई भगत, माजी नगरसेवक जावेद जहागीरदार, सीताराम मोहोरीकर, भगवान गीते, दीपक भगत, सुनील खरे यांच्यासह भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या आग्रही भूमिकेनंतर मुख्याधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. या कामाच्या एकाही निविदाचे पैसे नगरपालिकेने दिलेले नाही, असे या लेखीपत्रात म्हटले आहे. भाजपच्या तक्रारीबाबत शहर अभियंतामार्फत कामाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिल्याने भाजपनेही आंदोलन मागे घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या