Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमुख्य जलवाहिनीची समाजकंटकांतर्फे नासधूस; बोलठाणला पाणीपुरवठा विस्कळीत; दोषींवर कारवाईची मागणी

मुख्य जलवाहिनीची समाजकंटकांतर्फे नासधूस; बोलठाणला पाणीपुरवठा विस्कळीत; दोषींवर कारवाईची मागणी

बोलठाण । Bolthan (वार्ताहर)

बोलठाण गावास पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीची अज्ञात समाजकंटकांतर्फे काल रात्री तोडफोड करण्यात आल्याने आज गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. सदर जलवाहिनी दुरूस्तीचे काम ग्रामपंचायत प्रशासनातर्फे युध्दपातळीवर हाती घेण्यात आले असून दुरूस्ती होताच गावास पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती ग्रामसेवक भगवान जाधव यांनी दै. ‘देशदूत’शी बोलतांना दिली.

- Advertisement -

ग्रामपंचायतीच्या वतीने गावास सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीपासून जलकुंभात पाणी सोडणार्‍या मुख्य जलवहिनीची काल रात्री काही अज्ञात समाजकंटकांतर्फे तोडफोड करण्यात आल्याचे आज उघडकीस आले. पाणी पुरवठा व्यवस्था विस्कळीत करून गावात पाणीटंचाई निर्माण व्हावी या हेतूनेच हे कृत्य करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

गावात पाणी टंचाई निर्माण होऊ नये या यादृष्टीने ग्रामपंचायत प्रशासन सतर्क आहे. गावास पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य विहिरीस आडवे बोअर करण्यात आल्यामुळे चांगले पाणी विहिरीला आहे. सदर पाणी पिण्यासाठी योग्य असल्यामुळे त्याचा पुरवठा चार दिवसाआड गावाला केला जातो. दोन्ही विहिरींचे पाणी आटल्यानंतर खारी खामगाव धरणातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन ग्रामपंचायतीतर्फे केले जाते व इतर बोअर अधिग्रहीत केले जात असल्यामुळे पाणीटंचाई फारशी उद्भवत नाही.

मात्र मुख्य जलवाहिनीचीच तोडफोड करून गावास कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांतर्फे पुन्हा केला गेला. यापुर्वी देखील दोन-तीन वेळा जलवाहिनी तोडण्याचे प्रकार घडले असल्याने गावास पाणीटंचाईस सामोरे जावे लागले होते. मुख्य जलवाहिनीच तोडण्यात आल्यामुळे आज गावाचा पाणीपुरवठा खंडीत करावा लागला होता. जलवाहिनी दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून ते पुर्ण होताच गावाचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. जलवाहिनीची नासधूस करणार्‍याविरूध्द प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे केली जात आहे.

गुन्हा दाखल करणार

अशा प्रकारच्या कृतीने गावास वेठीस धरण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल तर त्याच्यावर कठोर कार्यवाही करण्यासही ग्रामपंचायत मागे हटणार नाही, असे ग्रामसेवक भगवान जाधव यांनी सांगितले. याबाबत नांदगाव पोलीस स्थानकात गुन्हा सुद्धा नोंदवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या