Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedWorld Water Day 2022 : पाणी निसर्गाने मानवाला दिलेले जीवनामृत

World Water Day 2022 : पाणी निसर्गाने मानवाला दिलेले जीवनामृत

आज घडीला जगावर पाण्याचे संकट आहे. असा एकही प्रदेश नाही जेथे पाण्याची आवश्यकता नाही. लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही. पुढील महायुद्ध पाण्यासाठी होईल, असं तुम्ही कित्येकदा ऐकलं असेल. मानव पाण्याचे महत्त्व विसरत आहे, ज्यामुळे आज पाण्याचे संकट सर्वांसमोर आहे. पाण्याचे हेच महत्त्व समजावून सांगण्याच्या उद्देशाने जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरूवात झाली. संयुक्त राष्ट्राचे सदस्य असलेल्या देशांकडून हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक जल दिन साजरा करण्याचा आंतरराष्ट्रीय पुढाकार ब्राझीलमध्ये 22 मार्च 1992 रोजी रिओ दि जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकासाच्या परिषदेत घेण्यात आला. 1993 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने महासभेत हा दिवस वार्षिक कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. पर्यावरण, आरोग्य, शेती आणि व्यापार यासारख्या विविध क्षेत्रांतील लोकांच्या महत्त्वपूर्ण विषयांबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी जगभर जागतिक जल दिन साजरा केला जातो. वर्ल्ड वॉटर डे उत्सवाचे मुख्य चिन्ह म्हणजे निळा जलाशयाचा आकार.

- Advertisement -

पाणी हा पर्यावरणातील प्रमुख घटक असून पाण्यामुळेच पर्यावरणास अर्थ प्राप्त होतो. पाण्यामुळेच पर्यावरणातील प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू आदी बहुतांश घटकांच्या जगण्यावर, वाढीवर आणि सुस्थितीत राहण्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. मनुष्य हा पर्यावरणाचा केंद्रबिंदू मानला जातो. पाण्याच्या माध्यमातून पर्यावरणाचा विकास साधणे हे केवळ मानवाच्या हाती आहे. पाणी हे जीवन आहे. त्याचा उपयोग केवळ पिण्यासाठी होत नाहीतर, अन्न, वस्त्र,निवारा आदी मूलभूत उपभोग्य वस्तू निर्माण करण्यासाठी होतो. पृथ्वीवर पाण्याचा साठा पुष्कळ आहे पण तो सर्वच मानवासाठी उपयोगी आहे असे नाही. पृथ्वीवरील पाण्यापैकी सुमारे 97 टक्के पाणी सागरी पाण्याच्या स्वरूपात आहे. म्हणजेच ते पाणी क्षारयुक्त आहे. केवळ दोन टक्के पाणी ध्रुव प्रदेशात बर्फ रूपात आहे, तर उरलेले जेमतेम एक टक्का पाणी नद्या, नाले, विहिरी, तलाव व भूगर्भात गोड्या पाण्याच्या रूपात आहे. याच एक टक्का पाण्यावर मानवाचे भौतिक संस्कृतीमधील सर्व चलनवलन अवलंबून आहे. या पाण्याशिवाय मानवाच्या भौतिक प्रगतीचे एकही पाऊल पुढे पडू शकत नाही.

तथापि, मानवी जीवनास व प्रगतीस अत्यावश्यक असलेले हे पाणी झपाट्याने प्रदुषित होत आहे. पृथ्वीवरील सर्व प्रकारचे जलप्रदूषण हीच मानवासमोरची मोठी समस्या म्हणून उभी राहिली आहे. दरवर्षी कडक उन्हाळ्यामुळे राज्यापुढे पाणी टंचाईचे भीषण संकट उभे राहण्याची शक्यता असते. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे, पाणीपुरवठा योजनेतील पाईप फुटून अथवा नळगळतीने होणारी नासाडी थांबविणे गरजेचे आहे. तलाव, विहीर, नद्या इत्यादी पाण्यांच्या स्त्रोतांचे प्रदूषण रोखणे, पावसाळ्यात पाण्याचे संवर्धन, उपलब्ध पाण्याचे वार्षिक नियोजन, पाणी वापराशी संबंधित कायदे, नियम याबद्दल जनजागृती तसेच शहरी भागात घरगुती पाणी वापरात बचतीचे उपाय आदी उपक्रमाला जर कृतिशिलतेची जोड दिली तर ते अधिक प्रभावी होईल. जलदिनाच्या निमित्ताने सर्वांनी जलसाक्षर होऊन जल संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. कारण जल है तो कल है.

स्वत:ला नेमकी किती पाण्याची आवश्यकता आहे हे ओळखून तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले पाहिजे. याच भुमिकेचा अंगीकार करून तिचा प्रसार केला तरी बरेच काही साध्य होवू शकते. तज्ञांच्या मते, जर तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. तथापि, दिवसेंदिवस पाण्याची टंचाई वाढत आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात भीषण परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. पाणी हे निसर्गाने दिलेली एक अमूल्य भेट आहे. पाण्याशिवाय मानवाच्या जीवनाला महत्त्व आणि अस्तित्व नाही. ते जीवन मग प्राण्याचे असो किंवा मानवाचे. परंतु आज आधुनिक युगात मानवाच्या दुर्लक्षामुळे धरतीवर पाण्याची कमतरता भासू लागली आहे. तसेच काही क्षेत्र दुष्काळग्रस्त आहेत पिण्यासाठी पाणी मिळत नाही आहे.

पाण्याची बचत कशी करावी – लोकांनी आपल्या बागांना आणि झाडांना गरज असल्यास पाणी देणे. पाईपने पाणी देण्यापेक्षा ते शिंपडणे अधिक चांगले होईल. पाण्याची गळती थांबविण्यासाठी पाईप लाईन आणि नाळ हे योग्य प्रकारे जोडले आहेत कि नाही याची दक्षता देणे. गाडी धुण्यासाठी पाईपऐवजी बादलीचा वापर करावा. आपण खुल्या नळाऐवजी भांड्यात पाणी घेऊन भाजी आणि फळे धुवावीत. नवीन घरे बांधतांना रेन वॉटर हॉर्वेस्टींग करावे यामुळे पाण्याचा मोठा साठा घरात साठलेला असेल.

पाणी हे आपल्या जीवनाचा आधार आहे. पाण्याची बचत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच पावसाचे पाणी हे आपल्याला बंधारा बांधून किंवा टाकीत एकत्र साठवून ठेवले पाहिजे. पाणी हे अमृत आहे आणि पाणी हेच जीवन आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या