Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजागतिक क्षयरोग दिन विशेष : सन 2025 पर्यंत क्षयरोगाला हद्दपार करण्याचे...

जागतिक क्षयरोग दिन विशेष : सन 2025 पर्यंत क्षयरोगाला हद्दपार करण्याचे उद्दिष्ट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र सरकारने 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने नाशिक शहर क्षयरोगमुक्त करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.

- Advertisement -

नाशिक शहरात जवळपास 653 क्षयरुग्णांना दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून शिधा पुरविला जात आहे. सन 2022 या वर्षात नाशिक महानगरपालिका क्षयरोग विभागाअंतर्गत खासगी दवाखाने व महानगरपालिका दवाखान्यात एकूण 3,450 रुग्ण निदान करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 3,593 क्षयरुग्णांचे निदान करण्यात येऊन 104 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. सन 2025 पर्यंत भारतातून क्षयरोगाला हद्दपार करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने आखले आहे.

शासनाकडून क्षयरुग्णांना दरमहा 500 रुपये आर्थिक मदत मिळतेच. त्याव्यतिरिक्त समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांच्याकडून देखील सकस आहार देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी लोकांचा सहभाग वाढला पाहिजे, समाजात क्षयरोगाविषयी असणारे भेदभाव कमी झाला पाहिजे. क्षयरुग्णांना योग्य आहार, उपचार वेळेवर मिळाल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो. समाजातील जास्तीत जास्त लोकांनी या अभियानात सहभागी होऊन क्षयरोगमुक्त नाशिक शहर व देश करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन मनपा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

‘येस वुई कॅन इन्ड टीबी’

क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी प्रत्येक रुग्ण दत्तक घेण्यासाठी ’निक्षय मित्र’ अशी योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, अधिकारी, राजकीय नेते यांनी रुग्ण दत्तक घेतलेले आहेत. ‘निक्षय मित्र’कडून रुग्णाला सहा महिने पोषण आहार पुरविला जातो. या पोषण आहारात तेल, बाजरी, ज्वारी, शेंगदाणे, कोणतीही एक डाळ यांचा समावेश होतो. या माध्यमातूनशासनाने टीबी संपवण्याचा निर्धार केलेला असून, त्यासाठी ‘येस वुई कॅन इन्ड टीबी’हे घोषवाक्यही प्रसारीत करण्यास सुरूवात केलेली आहे. समाजातील दानशूरांनी प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानात ‘निक्षय मित्र’ म्हणून सहभागी होऊन क्षयरुग्णांना पोषण आहार द्यावा, असे आवाहन नाशिक मनपाने केले आहे.

क्षयरोगाची लक्षणे

दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा ताप येणे, छातीत दुखणे ही क्षयरोगाची प्रमुख लक्षणे आहेत. रुग्णाचे मनोबल वाढवण्यासाठी रुग्ण राहत असलेल्या खोलीतील हवा खेळती ठेवावी. सकस आहार, फळे आहारात द्यावी. जेवण आणि औषधी वेळेवर घ्यावीत. मास्कचा वापर करावा.

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्त्वाचा

खाजगी दवाखान्यात निदान आणि उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या अधिक आहे. याकरिता सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक, प्रयोगशाळा, रेडिओलॉजिस्ट यांनी स्वतःहून पुढे येऊन निदान झालेल्या व उपचार घेत असलेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती शासनास कळवणे बंधनकारक आहे. जेणेकरून सर्व क्षयरुग्णांना योग्य उपचार व उपचार संपेपर्यंत पाठपुरावा क्षयरोग विभागामार्फत करणे शक्य होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या