Friday, April 26, 2024
HomeUncategorizedजागतिक स्किजोफ्रेनिया दिन विशेष : ज्ञान, दृष्टी आणि कृती मन सुदृढतेची ज्योती

जागतिक स्किजोफ्रेनिया दिन विशेष : ज्ञान, दृष्टी आणि कृती मन सुदृढतेची ज्योती

डॉ. अभिजीत कारेगांवकर (बालमनोविकार तज्ज्ञ)

दरवर्षी 24 मे हा “जागतिक स्किजोफ्रेनिया दिवस” म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने जनजागृती करण्याचा उद्देश. हा एक गंभीर स्वरूपाचा आणि बर्याचदा दीर्घकाळ चालणारा मानसिक आजार आहे.

- Advertisement -

लक्षणे : किमान सहा महिन्यांकरिता १) भ्रम २) भास ३) विक्षिप्त वर्तन ४) विचित्र बोलणे ५) स्वमग्नता, एकलकोंडेपणा, खूप वेळ एकाच स्थितीत राहणे, अनासक्ती इ.

कारणे : डोपामिन रसायनातील बदल, अनुवांशिकता व इतर मनोसामाजिक कारणे.

उपचार : एंटीसायकाॅटीक गटातील गोळ्या, दीर्घ कार्य करणारी इंजेक्शन्स. अतितीव्र आजाराकरिता सुधारित विद्युत चिकित्सा, मानसोपचार, पुनर्वसन, कौटुंबिक व सामाजिक समुपदेशन.

‘अहो, मानसिक समस्या फार वाढत आहेत सध्या. खरेच त्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे ?’असे वाक्य ऐकले की आम्हां मनोविकार तज्ज्ञांच्या मनात संमिश्र भावना उमटतात. कारण हे वाक्य जितके मानसिक आरोग्याविषयी जागरूक असल्यासारखे वाटते तितकेच त्या वाक्यानंतर होणारे वर्तन मात्र अनेकदा निराश करणारे असते. मानसिक आजाराकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन एक समाज म्हणून सध्या बदलतो आहे. सकारत्मक होताना दिसत आहे. असे असूनही त्याची परिणती अजूनही हव्या तशा वर्तनात होताना दिसत नाहीये.

याच्याशी निगडीत एक संकल्पना आधुनिक वैद्यकशास्त्रात आहे, ज्याला “के. ए.पी. गॅप” असा शब्द आहे. ‘के’ म्हणजे “नॉलेज” अर्थात एका विषयाबद्दलचे ज्ञान किंवा माहिती, ‘ए’ म्हणजे एटीट्युड अर्थात त्याबद्दलची दृष्टी किंवा दृष्टीकोन, ‘पी’ म्हणजे प्रक्टीस अर्थात त्याला अनुषंगाने अपेक्षित असणारी कृती, आणि ‘गॅप’ म्हणजे या तीन्हीतील अंतर किंवा तफावत.

या संकल्पनेनुसार एक तर लोकांना ज्ञातच नसते की माणसाच्या वागण्यातील अमुक अमुक लक्षणे म्हणजे मानसिक आजार असू शकतो, किंवा हा आजार काय आणि कशामुळे होतो, त्याचे उपचार काय, कुठे आणि कसे होतात इ. क्वचित मानसिक आजार असतो याची जाणीवही नसते.

दुसरीकडे जरी जाण असली, तरी त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक, निराशावादी किंवा अवैद्यानिक असतो. उदा: मानसिक आजार म्हणजे कलंक असल्याची भावना, लोक काय म्हणतील हा विचार, हा आजार नसून व्यक्तीने जाणीवपूर्वक केलेले नाटक आहे, बाहेरचे होणे इ.

आणि तिसरे म्हणजे इतर दोन्ही योग्य असूनही काही कारणाने त्या अनुषंगाने अपेक्षित असणारे वर्तन होत नाही. जसे की, मनोविकार तज्ज्ञाकडे घेऊन न जाणे, योग्य ते औषधोपचार न घेणे, रुग्णाशी असलेल्या वर्तणुकीत आणि त्याच्या जीवनशैलीत हवे ते बदल न घडवणे, रुग्णाला समजून न घेणे, गोळ्या चुकवणे, सुधारित विद्युत उपचार देण्यास घाबरणे ई.म्हणजे त्यांच्या के, ए, आणि पी मध्ये बरीच तफावत असते किंवा ते सुसंगत नसतात.

या तीन पैकी सध्या काय दिसते आहे? पूर्वीपेक्षा आता लोकांमध्ये मानसिक आजाराबद्दल माहिती जरा अधिक प्रमाणात आहे. हे प्रमाण अगदी समाधानकारक नसले तरी ज्या वेगाने तिचा प्रसार आणि स्वीकार होत आहे तो पूर्वीपेक्षा बरा आहे. मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा आधीपेक्षा बऱ्याच प्रमाणात सकारात्मक आहे.

आजारांचे महत्त्व मान्य करणारा आहे. परंतु असे असून देखील या सगळ्याला अनुसरून जी कृती व्हायला हवी, जी योग्य दिशेने पाऊले उचलायला हवीत, ते काही होताना दिसत नाहीत. खाजगीत बोलताना “हो, मानसिक स्वास्थ्य खूप महत्त्वाचे, आजकाल फारच गरज आहे त्याबद्दल बोलण्याची!” इत्यादी संवाद असतात.

पण आपल्याच घरात किंवा आपल्या स्वतःला जेव्हा मानसिक त्रास होऊ लागतो तेव्हा चटकन सर्दीखोकल्या साठी ज्या सहजतेने डॉक्टरकडे जातो त्या सहजतेने मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे होत नाही. मेंदूरोगतज्ज्ञांची मदत घ्यायला एकवेळ तयार होतात पण मनोविकारतज्ज्ञ म्हटले की “कुजबुज”, “मी / हा काही वेडा आहे का?”, “इतका काही नाही त्रास” असे म्हणून टाळण्याकडे कल असतो.

हे नसावे, यात बदल व्हावा, के.ए.पी. गॅप कमी व्हावे, जनमानसात असणारे विविध गैरसमज, मनोसामाजिक अडथळे आणि संकोच दूर व्हावेत आणि लोकांना मानसिक आरोग्याची तपासणी करून घेणे सोयीचे वाटावे आणि परवलीचे व्हावे, या हेतूने अनेक स्तरावर प्रयत्न होत असतात. त्यातीलच एक म्हणजे जागतिक स्तरावर पाळले जाणारे विविध मानसिक आजारांविषयीचे “जनजागृती दिवस” !

वाचकहो, आजच्या जागतिक स्किजोफ्रेनिया दिनाच्या निमित्ताने या आजाराविषयी इथे अगदी थोडक्यात माहिती देत आहे. पण इतर अनेक ठिकाणी आणि अनेक माध्यामतून तुम्हाला बरीच माहिती मिळेल. ती सगळी वाचून समजून घ्या. त्या अनुषंगाने त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यानुसार कृती करा. त्यात सांगितलेली लक्षणे कुणात दिसत असली तर लगेच मनोविकार डॉक्टरांकडे रुग्णाला लवकरात लवकर घेऊन जा. रुग्णाबद्दल आस्था बाळगा. आजारावरील उपचार, त्यांचा एकूण कालावधी, घ्यावयाची काळजी आणि खबरदारी इ. नीट समजून घ्या.

तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याची आणि दृष्टीकोन बदलासाठी पूरक वातावरण तयार करायची जबाबदारी जरी आरोग्य व्यवस्थेची आहे असे मानले, तरी त्यानुसार वर्तनात बदल घडवायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे हे स्वीकारुयात का? आणि नुसते हाच आजार का? एकूणच मानसिक आरोग्याबद्दल हेच करायला हवे. तसेही कोविड ची महामारी, लॉकडाऊन आणि त्यांचे विविधांगी परिणाम यामुळे सगळ्यांच्याच मनावर थोड्याफार प्रमाणात दडपण आणि ताण आलाच आहे.

केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. तेव्हा स्किजोफ्रेनिया आजाराविषयीचे आपले ज्ञान वाढवू, त्याबद्दल असलेली आपली दृष्टी सुधारून, तिला सकारत्मक दिशा देऊन त्यात करुणा व आस्था आणू, आणि आवश्यक ती कृती अवश्य करू, करत राहू.

- Advertisment -

ताज्या बातम्या