Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याWorld Economic Forum : राज्यात गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटी रुपयांचे...

World Economic Forum : राज्यात गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटी रुपयांचे सामंजस्य करार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

स्वित्झर्लंडमधील ( Switzerland) दावोस (Davos )येथे सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत(World Economic Forum ) विविध उद्योगांनी महाराष्ट्र सरकारसोबत ८८ हजार ४२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले. या करारात मुंबईतील इंडस् कॅपिटल पार्टनर्सच्या प्रकल्पाचा समावेश आहे. ही कंपनी १६ हजार कोटींची गुंतवणूक करून प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सेवा देणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दावोसमध्ये उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. आतापर्यँत ८८ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकींचे सामंजस्य करार झाल्याने महाराष्ट्रावर उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास सिद्ध झाल्याचे शिंदे यांनी येथे सांगितले.

विविध प्रकल्पांसमवेत झालेल्या सामंजस्य करारानुसार पुण्यात २५० कोटी रुपये खर्चाचा रूखी फुडसचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे राज्याची अन्नप्रक्रिया क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युअबेल एनर्जी) प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे ६ हजार ३०० जणांना रोजगार मिळेल. महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बर्कशायर- हाथवे या उद्योगाच्या १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून त्यामुळे नागरी विकासाला चालना मिळणार आहे.

पुण्याजवळ जपानच्या निप्रो कार्पोरेशन या उद्योगाचा १ हजार ६५० कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे महाराष्ट्रातील औषध निर्मिती क्षेत्रास चालना मिळणार आहे. यामुळे २ हजार रोजगार निर्मिती होईल. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करार प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग प्रधान सचिव डॅा. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. विपीन शर्मा आदी उपस्थित होते.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आले. या पॅव्हेलियनला भेट देऊन महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक प्रतिनिधीनी गर्दी केली आहे.

महाराष्ट्रात ब्रिटनची गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये ब्रिटनची गुंतवणूक अधिक व्हावी तसेच परस्पर सहकार्य वाढवण्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी आज दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये ब्रिटनच्या सर्वाधिक खपाच्या ‘दि डेली मेल’ संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई तसेच महाराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या पायाभूत विकासाच्या कामांविषयी विस्तृत माहिती दिली. मुंबई ते नागपूर या दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या विषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती देऊन पुढील दोन वर्षाच्या मुंबई महानगर प्रदेशाच्या विकास आराखड्याची माहिती दिली. सिंगापूरच्या माहिती आणि दूरसंचार मंत्री जोस्‍फाईन यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दूरसंचार क्षेत्रातील सुविधांविषयी चर्चा केली.

जपान बँकेसमवेत सुपा इंडस्ट्रीयल पार्कसंदर्भात चर्चा

दरम्यान, जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या ११ औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या ठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली.

सामंजस्य करार आणि अपेक्षित रोजगार

* अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प…. १५ हजार रोजगार

* ब्रिटनच्या वरद फेरो अॅलाँईजचा गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प ….. २ हजार रोजगार

* इस्त्रायलच्या राजूरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प ……… १ हजार रोजगार

* पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अॅटो सिस्टीम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे ४०० कोटी रुपयांचा प्लास्टीक ऑटोमोटीव्हज् प्रकल्प ….. २ हजार रोजगार

*गोगोरो इंजिनियरींग आणि बडवे इंजिनियरींगचा २० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा अॅटो प्रकल्प ……… विविध ठिकाणी ३० हजार रोजगार

- Advertisment -

ताज्या बातम्या