Thursday, April 25, 2024
Homeनगरजागतिक अपंग दिनविशेष : व्यवसाय उभारून केली अपंगत्वावर मात

जागतिक अपंग दिनविशेष : व्यवसाय उभारून केली अपंगत्वावर मात

शामराव पुरोहित (शेवगाव)

जीवनात कितीही संकटे आली, तरी डगमगून जाता कामा नये. त्या संकटाचा समर्थपणे मुकाबला करून आलेल्या संकटावर मात करून जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर आकाशाला गवसणी घालत उत्तुंग यश मिळवता येते. हा अनोखा आदर्श आपल्या जीवनातून तालुक्यातील चेडेचांदगाव येथील संदीप चेडे व त्यांच्या पत्नी अंजना चेडे या दिव्यांग दांपत्याने समाजापुढे ठेवला आहे.

- Advertisement -

चेडेचांदगाव येथील संदीप यांचा जन्म 12 एप्रिल 1990 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे इयत्ता 4 थी पर्यंतचे शिक्षण गावातच झाले. पुढील शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निमगाव मायंबा येथे मामाच्या गावाला दाखल झाल्यानंतर इयत्ता सहावीत शिकत असतांना त्यांचा उजवा पाय अचानक सुजला. त्यावेळी विविध ठिकाणी वैद्यकीय उपचारकरूनही तो बरा झाला नाही. त्यामुळे दोन ते तीन वेळा शस्त्रक्रिया करावी लागली. तरीही काहीच फरक पडला नाही.

शेवटी पायाला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याने त्यांचा उजवा पाय गुडघ्यां पासून काढावा लागला. तेव्हापासून त्यांच्यावर एका पायाने दिव्यांग होण्याची वेळ आली आहे. पुढे शिलाई काम करून त्यांनी आपला प्रपंच सुरु केला. गावातच एक छोटी किराणा दुकानही सुरु केली. शासनाच्या मुद्रा लोनचा लाभ घेवून व्यवसायात वाढही केली. गेवराई येथील भारत शिंदे या शिक्षकाच्या दिव्यांग कन्या अंजना बाबुराव शिंदे यांच्याशी लग्नगाठ बांधून त्यांनी संसार थाटला. माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून उपलब्ध झालेल्या झेरॉक्स मशीनमुळे जीवनाला कलाटणी मिळाल्याचे ते सांगतात.

प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका संघटक गणेश हनवते, शेवगाव येथील संतोष जाजू यांच्या सहकार्याने शहरातील भूमी अभिलेख व नगर परिषदेच्या कार्यालयाजवळ त्यांनी झेरॉक्स सेंटर उभारले. शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने व्यावसायात प्रगती साधत असल्याचे असे ते अभिमानाने सांगतात.

चेडे दांपत्याच्या या यशाचे श्रेय ते आपल्या मित्र परिवाराला देतात. राज्य शासनाने आता दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून शासनाच्या या निर्णयाचा समाजातील दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळून दिव्यांगांना सहन कराव्या लागणार्‍या अवहेलना आता काही प्रमाणात दूर होवून दिव्यांगांचे जगणे सुकर होणार असल्याच्या रास्त भावना त्यांनी जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने व्यक्त केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या