Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याजागतिक बालकामगार विरोधी दिवस - चिमुकले हात का करतात काम?

जागतिक बालकामगार विरोधी दिवस – चिमुकले हात का करतात काम?

नाशिक । प्रतिनिधी

आज 12 जून 2021! जागतिक बालकामगार विरोधी दिवस. कृती करा आणि बालकामगार प्रथा संपवा अशी यावर्षीची कल्पना (थीम) आहे. या प्रश्नाची तीव्रता वर्षानुवर्षे कायम आहे. ही प्रथा संपावी आणि मुलांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राहावा यासाठी अनेक कायदे आहेत. अनेक सामाजिक संस्थाही काम करतात. तथापि बालकामगारांची संख्या मात्र वाढतच जाते. असे का घडते?

- Advertisement -

भाजीपाला विकणे, चहाची टपरी, छोटी हॉटेल्स, दुकाने, रस्त्यावर सामान विकणे अशा अनेक ठिकाणी मुले मजुरी करतात. सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली की अशा ठिकाणी धाडी पडतात. पण काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे होते. असे का घडते?

कुठून येतात ही मुले? शाळा शिकण्याच्या वयात त्यांना मजुरी का करावी लागते? घरची गरिबी, घराला आर्थिक हातभार लावणे हेच मुख्य कारण सांगितले जाते. ज्यांचे पालक व्यसनाधीन आहेत त्यांच्या मुलांवर देखील मजुरी करण्याची वेळ येते. असे का घडते? प्रयत्न करूनही बालमजुरी का संपत नाही?

कारणांचा शोध घ्यायला हवा!

खूप लोकांना रोजगार नसतो आणि घरात खाणारी तोंडे जास्त असतात. काही वेळा मुलांना पटकन काम मिळते. मोठ्यांना तितके पटकन मिळत नाही. लहान मुले लवचिक असतात. त्यांना हक्कांची आणि कायद्याची फारशी जाणीव नसते. त्यांना फक्त स्वतःची आणि घरच्यांची भूक कळते. म्हणूनही त्यांना काम दिले जाते आणि मोठ्या माणसांना कामापासून वंचित ठेवले जाते.

काही मुले अनाथ असतात. काहींना एकच पालक असतो. अशा मुलांकडे काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. ज्यांचे पालक सतत कोणत्या ना कोणत्या ताणात असतात अशांचीही मुले लवकर कामाकडे वळतात. आई बरोबर मुलीही मोठ्या प्रमाणात काम करतांना आढळतात. आपली मुलगी आपल्याबरोबर सुरक्षित या भावनेनेही काम करणार्‍या काही आया मुलींना बरोबर घेऊन जातात. अशा मुली हळूहळू काम शिकतात आणि नंतर करायलाही लागतात. मोठ्या माणसांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे बालमजुरीचे बांडगुळ पोसले जाते. बालमजुरीमागच्या अशा अनेक कारणांचा शोध घेऊन त्यांची उत्तरे शोधल्याशिवाय बालमजुरी कशी थांबेल असे मत सामाजिक कार्यकर्त्या राजश्री दामले यांनी व्यक्त केले.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती

हे मुख्य कारण असते. काही मुलांचे आईवडील दोघेही मजुरी किंवा अन्य काम करण्यासाठी सकाळपासून बाहेर पडतात. आपल्यामागे मुले एकटी घरी राहिली तर त्यांना वाईट वळण लागेल अशी भीती त्या पालकाना वाटते. त्यापेक्षा त्याने काम केलेले काय वाईट अशी त्यांची भावना असते असेही आम्हाला काहीवेळ आढळले. अनेकांच्या आजूबाजूला शिक्षणाचे वातावरण नसते. काय करणार आहेस शाळेत जाऊन असे विचारणारेच खूप असतात. अशी मुले मग काम करतात.

काहींवर चित्रपटाचा प्रभाव असल्याचेही आढळले. चित्रपटातील हिरो काम करून मोठा होतो. मग काही मुलांनाही तसेच वाटू लागते. तेही छोटेमोठे काम करतात. मोठ्यांना जास्त पगार द्यायला लागतो आणि मुलांना कमी दिला तरी चालतो. अशी अनेक कारणे यामागे असतात. समाजात जनजागृती व्हावी आणि त्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करणारे उपाय योजले जायला हवेत असे मत जिल्हा चाईल्डलाईन नवजीवन फाउंडेशनचे केंद्र समन्वयक प्रवीण आहेर यांनी व्यक्त केले. तात्पुरत्या उपाययोजना करून बालमजुरी संपुष्टात येणार नाही. त्यासाठी दीर्घकालीन उपाय योजले जायला हवेत असेच मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या