Blog : उपचार नाहीत, उपाय आहे; अल्झायमर्स आव्हान आहे…!

jalgaon-digital
7 Min Read

नाशिक | Nashik

21 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी ‘जागतिक अल्झायमर्स दिवस’ (world alzheimer day) म्हणून साजरा केला जातो. या आजाराबाबत अधिक जनजागृती व्हावी, लोकांच्या मनातील गैरसमज दूर व्हावे, प्रशासन किंवा नियोजनकर्त्यांना उपाययोजना व त्यासाठी अधिक गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करता यावे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे….

अल्झायमर म्हणजे काय? What is Alzheimer?

जेष्ठ नागरिकांमध्ये आढळणारा हा एक मेंदूचा आजार आहे. हा एक प्रकारचा डिमेन्शिया अर्थात स्मृतिभ्रंश आजार आहे. डिमेन्शियाचे अनेक प्रकार आहेत- जसे वास्कुलर डिमेन्शिया, लेवी बॉडी डिमेन्शिया, पण अल्झायमर्स हा त्यातील सर्वात प्रमुख प्रकार! एकूण डिमेन्शियापैकी 60% अल्झायमर्स या प्रकारात मोडतो.

वाढत्या वयासोबत मेंदूतील पेशी कमजोर होतात. सुकतात. त्यांच्यातील परस्पर कनेक्शन कमी होतात आणि कालांतराने त्या पेशी म्हणजे न्यूरॉन मृत होतात. याचा एकूण परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो. 1906 साली पॅथॉलॉजिस्ट डॉ. अल्झायमर यांना एका महिलेच्या मेंदूचे मृत्यूपश्चात परीक्षण करताना त्यात विशिष्ट प्रकारचे प्रोटीन जमा झालेले आढळून आले. मृत्यूपूर्वी त्या महिलेच्या वर्तनात विशिष्ट प्रकारचे बदल दिसून आले होते. या लक्षणांच्या समूहास ‘अल्झायमर्स डिमेन्शिया’ असे नाव दिले जाते.

अल्झायमर्सची लक्षणे

डिमेन्शियामध्ये सर्वात जास्त परिणाम स्मृतीवर होतो. जुन्या घटना किंवा स्मृती टिकून असतात, पण थोड्या वेळापूर्वी घडलेले आठवत नाही. म्हणून एकच कृती पुन:पुन्हा केली जाते. सतत एकच प्रश्न विचारणे किंवा तेच ते पुन्हा बोलणे अशा घटना घडतात. नवीन माहिती शिकणे, माहितीवर प्रक्रिया करून निर्णय घेणे, उत्स्फूर्तपणे काम करणे, भाषा आणि संवाद कौशल्य यांच्यावर परिणाम होतो. वेळ, स्थळ आणि परिसराबाबत संभ्रमित अवस्था होते. दैनंदिन गोष्टी जसे: घरकाम, स्वतःची काळजी, कपडे घालणे इत्यादी करणे अवघड होत जाते. दिशा आणि उजवे-डावे यात गोंधळ होतो. म्हणून आपल्याच परिसरात हरवणे किंवा घरातल्याघरात रूम चुकणे अशा घटना घडतात.

हे सर्व घडत असताना या लक्षणांची रुग्णाला जाणीव नसते. त्यामुळे भावनांवर परिणाम होतो. चिडचड होते. उदास वाटते. झोप कमी होते. स्वच्छतेच्या समस्या निर्माण होतात. रुग्ण दैनंदिन कामासाठीसुद्धा कुटुंबावर अवलंबून असतो. म्हणून पूर्ण कुटुंबाची घडी विस्कळीत होते.

अल्झायमर्स का होतो?

1. वाढते आयुष्यमान हा सर्वात महत्वाचा घटक! जसे वय वाढत जाते तशी हा आजार होण्याची शक्यता वाढत जाते.

2. अनुवंशिकता हा दुसरा महत्वाचा घटक! आधीच्या पिढीत अल्झायमर्स झाला असेल तर पुढच्या पिढीत ही शक्यता अधिक.

3. काही विशिष्ट आजार जसे: मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा यामुळे स्मृतिभ्रंश होण्याची संभावना वाढते.

4. व्यसनाधीनता, धृम्रपान यामुळेही धोका वाढतो.

5. दूषित जीवनशैली जसे: कमी शारीरिक हालचाल करणे, व्यायामाचा अभाव, झोपेच्या चुकीच्या सवयी यामुळे धोका वाढतो.

6. कमी शिक्षण घेतल्याने मेंदूतील काही भाग उपयोगात आणला जात नाही, अशावेळी वृद्धपकाळात मेंदूतील त्या पेशी लवकर अकार्यक्षम होतात.

निदान कसे करता येईल?

अल्झायमरचे निदान हे एक्सक्लुजन पद्धतीने होते. ज्यावेळी स्मृतिभ्रंशाची सर्व लक्षण दिसतात, पण त्यासाठी इतर कोणतेही ठोस कारण तपासणीत आढळून येत नाही तेव्हा त्यास ‘अल्झायमर्स डिमेन्शिया’ असे म्हटले जाते. थायरॉईडचे आजार, कुपोषण आणि जीवनसत्वाचा कमतरता, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब, व्यसनाधीनता, मेंदूचे इन्फेक्शन, फिटचे आजार, किडनी किंवा लिवरचे आजार यातही स्मृतिभ्रंशची लक्षणे दिसतात. हे सर्व निदान करून उपचार करण्यासारखे आजार आहेत. वेळेत उपचार केल्यास स्मृतिभ्रंशाची लक्षणे नाहीशी होतात. यापैकी कोणताही आजार नसेल आणि रुग्ण तपासणी व नातेवाईकांच्या इंटरव्ह्यूमध्ये स्मृतिभ्रंशाची माहिती मिळत असेल त्यावेळी त्यास ‘डिमेन्शिया’ असे रोगनिदान केले जाते. सर्व प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या, सीटी किंवा एमआरआय स्कॅन आणि बुद्धिकार्यक्षमता चाचणी करून रोगनिदान केले जाते.

उपचार आणि उपाय

इतर कोणत्याही आजारामुळे डिमेन्शियाची लक्षणे दिसत असतील तर त्याप्रमाणे उपचार सुरू करावे लागतात. डिमेन्शियावर कोणताही उपचार नाही आणि हा आजार बराही करता येत नाही. सद्यस्थितीत या आजाराचा वेग कमी करणारी औषधे उपलब्ध आहेत (कोलीनइस्ट्रेज इनहिबिटर). त्यामुळे रोगवाढीचा वेग कमी होतो. म्हणून लवकर निदान आणि औषध सुरू करणे फार महत्वाचे ठरते.

कोणताही ठोस उपचार उपलब्ध नसल्याने आणि रुग्ण नातेवाईकांवर अवलंबून असल्याने कुटुंबातील सदस्यांचे प्रशिक्षण, त्यांना मानसिक आधार देणे, स्व-मदतगट स्थापन करणे आणि उपचारामुळे निर्माण होणारा तणाव नियोजन करण्याचे शिक्षण घेणे हे देखील महत्वाचे! आजार तीव्र स्तरावर पोहचल्यावर रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागतात.

डिमेन्शियासोबत रुग्णामध्ये मानसिक व वर्तणूक समस्या निर्माण होतात. त्यासाठी मानसोपचारतज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करावेत.

अल्झायमर्स एक आव्हान

भारत हा तरुणांचा देश आहे. आज आपली लोकसंख्या 135 ते 140 कोटींच्या दरम्यान आहे. आज देशात 10 % लोक जेष्ठ नागरिक आहेत. दिवसेंदिवस त्यांचे समाजातील प्रमाण वाढत जाणार आहे. किमान 5% जेष्ठ नागरिकांमध्ये डिमेन्शिया आजार होतो. म्हणजे आज भारतात 60 लाख डिमेन्शिया रुग्ण आहेत. म्हणजेच 60 लाख कुटुंबे या आजाराशी सामना करीत आहेत. याचा खूप मोठा सामाजिक तसेच आर्थिक ताण संपूर्ण व्यवस्थेवर निर्माण होतो. वाढत्या वयोमानासोबत आपल्या देशासमोरील स्मृतिभ्रंशाचे आव्हान अधिक वाढत जाणार आहे. यासाठी देशपातळीवर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

● व्यापक प्रमाणात जनजागृती

● लवकर निदान व तपासणी

● अधिक उपचार आणि आधार केंद्र निर्माण करणे

● कौटुंबिक आधार आणि कुटुंबाचे प्रशिक्षण.

● आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण आणि सक्षमीकरण

● नियमित परीक्षण आणि उपचार सुधार.

● बौद्धिक चालना देणारे खेळ आणि इतर उपक्रम जेष्ठ नागरिकांसाठी नियमितपणे राबवणे.

● डिमेन्शिया केयर होम्स व डे केयर सेंटर निर्माण करून सक्षम करणे.

● नाविन्यपूर्ण उपचार आणि उपयांबाबत संशोधन आणि अंमलबजावणी

मेमरी क्लिनिक (Memory Clinic)

जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मेमरी क्लिनिक कार्यरत आहे. असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांना उपचार दिले जातात, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू आहे. या सर्व कार्यक्रमात योग्य समन्वय साधून रुग्णालयात येणाऱ्या जेष्ठ नागरिकांची स्मृतिभ्रंशासाठी तपासणी केली जाते. तसेच जेष्ठ नागरिक संघ, विविध कार्यालय, संस्था, गट यांच्यात स्मृतिभ्रंशाबाबत, हायरिस्क घटक आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत जनजागृती केली जाते. डिमेन्शिया रुग्णाची काळजी कशी घ्यायची याबाबत कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली जाते. आज तरी आपण एवढेच म्हणू शकतो की, ‘उपचार नाहीत उपाय आहे, अल्झायमर एक आव्हान आहे’.

देश अनेक पातळीवर प्रगती करणार, वैद्यकीय संशोधन आणि प्रगतीमुळे वयोमान वाढत जाणार आणि त्यासोबत देशातील जेष्ठांची संख्याही वाढणार, पण हे जेष्ठ शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या कार्यक्षम असणे एक आव्हान आहे, त्यासाठी आपण आजपासूनच तयार व्हायला हवे.

– डॉ निलेश जेजुरकर, मानसोपचारतज्ञ, नाशिक (Dr Nilesh Jejurkar, physiologist Nashik)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *