Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकनाशकात कामगारांचा उत्स्फूर्त बंद

नाशकात कामगारांचा उत्स्फूर्त बंद

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण, कंत्राटी करण्याच्या विरोधातील संपात जिल्ह्यात 200 उद्योगातील 15 हजार कामगारांनी सहभाग घेत शासनाच्या (Government) धोरणाचा निषेध केला…

- Advertisement -

कामगारांच्या मेळाव्याला संबोधन करताना केंद्राचे कायदे महाराष्ट्रात लागू न करण्याची मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड (Dr. D. L. Karad) यांनी केली. देशातील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या दोन दिवसीय संपामध्ये नाशिक जिल्ह्यात सिटू (CITU) संलग्न कारखाने त्याचबरोबर बांधकाम मजुर, घरकामगार, असंघटित कामगार यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

सिटूच्या नेतृत्वात 200 पेक्षा जास्त उद्योगातील 15 हजार कामगारांनी या संपात सहभाग घेतला आहे. सातपूर, नविन नाशिक, नाशिकरोड, सिन्नर, इगतपुरी, मालेगाव, दिंडोरी, निफाड याठिकाणी कामगार वर्गाने मोर्चे काढून निवेदन देत शासनाच्या धोरणांचा निषेध केला.

सिटू भवनमध्ये घेण्यात आलेल्या कामगार मेळाव्यात केंद्र सरकारने (Central Government) कामगार विरोधी चार श्रम सहिता रद्द कराव्यात, महागाई बेरोजगारी आटोक्यात आणावी, कंत्राटीकरण खाजगीकरणाचे धोरण मागे घ्यावे, सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण आणि विक्री थांबवावी, कंत्राटी कामगारांना कायम करावे, किमान वेतन दरमहा 26 हजार रुपये देण्यात यावे, बेरोजगारांना नोकरी द्यावी अन्यथा पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता द्यावा, ज्येष्ठ नागरिकांना नऊ हजार रुपये पेन्शन द्यावी,शिक्षण आणि आरोग्य मोफत मिळण्याची व्यवस्था करावी व यासाठी अति श्रीमंतांवर कर वाढवावेत अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली.

कामगार वर्गाने या निर्णायक लढ्यात मोठ्या संख्यने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्याचे प्रास्ताविक कॉम्रेड सिटूचे जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे (Sitaram Thombre) यांनी केले व आभार भिवाजी भावले (Shivaji Bhavle) यांनी मानले.

ठिकठिकाणी मोर्चाचे आयोजन

कामगार संघटना कृती समितीने संपाचे आवाहन केले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये 28 मार्च रोजी विविध ठिकाणी सुमारे 5 ते 6 हजार कामगारांनी सहभाग घेतला होता.
सातपूर (Satpur) येथील सीटू ऑफिसपासून ते सिटू कामगार भवन खुटवडनगर तसेच सिडको पवननगरपासून सीटूभवन येथे कामगारांचा भव्य मोर्चा डॉ. डी एल कराड, राष्ट्रीय उपाध्यक्ष सिताराम ठोंबरे, राज्य उपाध्यक्ष संतोष काकडे, भिवाजी भावले, कैलास धात्रक, सतीश खैरनार, सिंधू शार्दुल ,भागवत डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. या मोर्चात सुमारे तीन हजार कामगार सहभागी झाले होते.

नाशिकरोड (Nashikroad) येथे हिरामण तेलोरे (Hiraman Telore) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात 80 कामगार सहभागी झाले होते. इगतपुरी (Igatpuri) येथे कॉ. देविदास अडोळे व कॉ.दत्ता राक्षे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात 500 कामगारांचा सहभाग होता. सिन्नर येथे कॉ. हरिभाऊ तांबे, कॉ. संतोष कुलकर्णी यांचे नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात 700 कामगार सहभागी झाले होते.
दिंडोरी (Dindori) येथे कॉ. आप्पा वटाणे, कॉ. विकास गुच्छाईत ,कॉ. अरविंद जगताप यांच्या नेतृत्वाखाली तहसीलवर मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात दोनशे कामगार सहभागी झाले होते. निफाड (Niphad) येथे कॉ. बंडू बागुल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 25 कामगार सहभागी होते. मालेगाव (Malegaon) येथे कॉ. तुकाराम सोनजे व कॉ.रमेश जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली तहसीलवर मोर्चा काढण्यात आला 50 कामगार सहभागी झाले होते. मोर्चामध्ये एकूण 4600 सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या