कामगारांच्या प्रमाणपत्रावर सह्या देण्यास ग्रामसेवकांची टाळाटाळ

jalgaon-digital
2 Min Read

शेवगाव |वार्ताहर|Shevgav

तालुक्यातील बर्‍याच ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक बांधकाम कामगारांच्या 90 दिवस काम केल्याच्या

प्रमाणपत्रावर सह्या देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे संतप्त कामगारांनी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जनशक्ती श्रमिक संघाचे अध्यक्ष सोपान पूरनाळे, सचिव संजय दुधाडे, जनशक्ती विकास आघाडीचे उपाध्यक्ष संजय आंधळे आदी प्रमुख उपस्थितीत होते. निवेदनात म्हटले आहे की, मौजे चापडगाव येथील बांधकाम कामगारांच्या 90 दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक सही करत नसल्याची लेखी तक्रार 16 सप्टेंबर रोजी जनशक्ती श्रमिक संघ, शेवगाव यांच्याकडे केली होती. या मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी व नुतनीकरण करण्यासाठी बांधकाम कामगारांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवकाने खात्री करून सही करण्याचे आदेश आहेत, असे असताना देखील चापडगाव येथील बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर ठेकेदारांची सही असताना देखील ग्रामसेवक त्या प्रमाणपत्रावर सही करत नसून उलट बांधकाम कामगारांना अरेरावीची व उद्धट भाषा वापरली जाते.

कोव्हिड 19 या रोगाच्या पार्श्वभूमिवर गेल्या सहा-सात महिन्यांपासून बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी बंद होती. संघटनेच्या प्रयत्नातून ऑनलाईन नोंदणी आता चालू झाली आहे. त्यामुळे या कामगारांच्या प्रमाणपत्रावर सही न करणे ही बाब अत्यंत चुकीची आहे.

कामगारांना शासनाच्या लाभापासून वंचित रहावे लागल्यास याला जबाबदार कोण? याबाबत शेवगाव तालुक्यातील ग्रामसेवकांना बांधकाम कामगारांची सत्यता पडताळून बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर सह्या देण्याचे आदेश देण्यात यावेत. कामगारांच्या प्रमाणपत्रावर सह्या न दिल्यास पंचायत समिती कार्यालयावर मंगळवार दि. 29 सप्टेंबर रोजी तालुक्यातील बांधकाम कामगार धरणे व आंदोलन करणार असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन ग्रामसेवकांना प्रमाणपत्रावर सह्या करण्याचे लेखी आदेश देणार असल्याचे यावेळी सांगितले. निवेदनावर अंबादास विघ्ने, विघ्नेश्वर फुंदे, लंकाबाई केदार, नागनाथ मते, जगदीश नेमाने, संतोष पातकळ, कृष्णा दिवटे, बाबासाहेब ढाकणे, रामा खंडागळे, संजय धायगुडे, सुनील दारकुंडे यांच्या सह्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *