Thursday, April 25, 2024
Homeनगररेल्वेच्या भुयारी पुलाखालील पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठीची कामे सुरु

रेल्वेच्या भुयारी पुलाखालील पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठीची कामे सुरु

पुणतांबा (वार्ताहर) – येथील चांगदेवनगर रेल्वे चौकीजवळ सुरु असलेल्या रेल्वेच्या भुयारी पुलाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. भुयारी पुलाच्या कामात प्राधान्याने पावसाळ्यात भुयारी पुलावर गोळा होणार्‍या पावसाच्या पाण्याची तातडीने विल्हेवाट लावण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.

चितळी रेल्वे स्टेशन, जळगाव रेल्वे चौकी तसेच धनगरवाडी रेल्वे चौकीसह दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर ज्या ज्या ठिकाणी भुयारी पुलाची कामे पूर्ण झाली होती तेथे मागील पावसाळ्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. ग्रामस्थांनी सातत्याने तक्रारी करून आंदोलन सुद्धा केले होते. या पावसाळ्यात तसे होऊ नये म्हणून जेथे भुयारी पुलाची कामे सुरु आहेत तेथे पाण्याची विल्हेवाट लावण्याची कामे प्राधान्याने हाती घेतली आहे. चांगदेवनगर येथील भुयारी पुलाचे काम अतिंम टप्प्यात आहे. गोळा होणार्‍या पाण्याचा निचरा करण्यासाठी भुयारी पुलाच्या पूर्व बाजूला असलेल्या समांतर रस्त्याच्या उत्तर बाजूला मोठी नाली खोदण्यात आली असून तेथे पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंटच्या नळ्या टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे चांगदेवनगर येथील ग्रामस्थांची पावसाळ्यात भुयारी पुलाखाली पाणी गोळा झाले तर वाहतूक ठप्प होईल ही सातत्याने वाटणारी चिंता सध्या तरी काही अंशी कमी झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान पुणतांबा येथील स्टेशन रोडवर असलेल्या रेल्वे फाटकात गेल्या दोन दिवसापासून दुरुस्तीची कामे सुरु असल्यामुळे पुणतांबा मार्गे श्रीरामपूर व कोपरगावकडे जाणारी सर्व वाहतूक चांगदेवनगर मार्गे भुयारी पुलाखालून व्यवस्थितपणे सुरु आहे. मात्र आशा केंद्र चौक ते गणपती फाटा श्रीरामपूर रोड पर्यंत रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे मोठ्या वाहनांना अनेक ठिकाणी वाहतूक करताना अडचणी येत आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या श्रीरामपूर व कोपरगाव येथील अधिकारी वर्गाने रस्त्याची तातडीने पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी प्रवाशी वर्ग तसेच वाहन धारकाकडून केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या