Friday, April 26, 2024
Homeनगरमहिलांच्या उपचारांसाठी नगर जिल्ह्याला 2 कोटी

महिलांच्या उपचारांसाठी नगर जिल्ह्याला 2 कोटी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविण्यात येत असून लाभार्थींना तपासणीसाठी शिबिरांच्या ठिकाणी आणणे व घरी पोहच करणे तसेच औषध उपचारांसाठी सन 2022-23 मध्ये जिल्हा नियोजन समितीकडील अर्थसंकल्पीत केलेल्या निधीतून प्रत्येक जिल्ह्याला 2 कोटी रुपये इतका निधी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांना उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

- Advertisement -

2 कोटींमधून प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या स्तरावर ग्रामीण भागासाठी 1 कोटी (वाहतूक व औषधांसाठी प्रत्येकी 50 लाख) व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या स्तरावर शहरी क्षेत्रासाठी 1 कोटी (वाहतूक व औषधांसाठी प्रत्येकी 50 लाख) खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याचा नगर जिल्ह्यातील लाभार्थ्याना लाभ होणार आहे.

माता व बालमृत्यूचे प्रमाण निरंतर कमी होत असतांना गरोदरपणात रक्तक्षय कर्करोगाचे प्रमाण वाढत असून तरूणी व महिलांमध्ये इतर आजार देखील बळावत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबवत 18 वर्षावरील सर्व तरूणी,महिला व गरोदर स्त्रियांची सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी शिबीरांचे आयोजन जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात या शिबीरांचे आयोजन केले जात आहे. या योजनेचा शुभारंभ नवरात्रोत्सवापासून सुरू झालेला आहे.

या शिबीरात तरूणी, महिला व गरोदर महिलांची स्त्रीरोगतज्ञासह रेडिओलॉजिस्ट, सर्जन, फिजिशियन, त्वचा व अस्थिरोगतज्ञ आदी विविध तज्ञ डॉक्टरांतर्फे तपासणी करून उपचार केले जात आहेत. रक्त, लघवी, सोनोग्राफी, क्ष किरण तपासणी आदी सर्व तपासण्या देखील मोफत केल्या जाणार असून आवश्यकता असलेल्या महिलांवर शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार आहेत.

आरोग्य तपासणीसह तरूणी व महिलांना साथरोग, गर्भधारणापुर्वीची काळजी, सकस आहार, कुटूंब कल्याण कार्यक्रम, आभा कार्ड नोंदणी आदींचे मार्गदर्शन देखील वैद्यकीय अधिकार्‍यांतर्फे केले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या