Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकजहागीरदाराने बांधले दगडाच्या भिंतीचे घर, गावाचे नाव झाले 'भिंतघर'

जहागीरदाराने बांधले दगडाच्या भिंतीचे घर, गावाचे नाव झाले ‘भिंतघर’

नाशिक । दिनेश सोनवणे

इरमाळ छोटेसे देखणे अतिदुर्गम भागातील एक गाव. नाशिकपासून सुमारे १०० किमी अंतरावर आहे. गावात एक मोठे जहागीरदार होऊन गेले. त्या जहागीरदाराने त्या काळी तिथे भव्य असे दगडांच्या भिंतीचे एक मोठे घर बांधलेले होते. त्या दगडाच्या भिंतींनी बांधलेल्या घरावरून या गावाची ओळख ‘भिंतघर’ म्हणून झाली….

- Advertisement -

इरमाळ झाले भिंतघर

सुरगाणा या आदिवासी तालुक्यातील केम डोंगर कपारीच्या कुशीत वसलेले, ९०-१०० उंबऱ्यांच, सुमारे ४५० लोकसंख्या असणारं एक छोटेसे टुमदार गाव. हळूहळू या गावात अनेक वेगवेगळे बदल होत गेले. पूर्वी या गावात इथले सर्व आदिवासी ग्रामस्थ अशिक्षित होते. ते कुडाच्या व बांबूपासून बनविलेल्या भिंतींच्या घरात राहायचे.

कागदोपत्री जरी या गावाचे नाव भिंतघर झालेलं असेल, तरी जुनी जाणती माणसं आजही या गावाला इरमाळ म्हणूनच ओळखतात, हे विशेष! भिंतघरहे आदिवासी पाड्यातल्या इतर गावांसारखेच एक मजुरांचे आदिवासी गाव. पावसाळ्यातील चार महिन्यांची भातशेती सोडली, तर इतर वेळी इथली माणसं मजुरीसाठी शहरांकडे स्थलांतरित होतात.

या गावात विशेषतः मुलींच्या शिक्षणाकडे संपूर्ण गावकऱ्यांचे व पालकांचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे एका जितेंद्र गवळी नामक शिक्षकाला दिसले. अनेक दिवस हे प्रत्यक्ष उघड्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलेले होते. शिक्षणाच्या बाबतीतले येथील हे भयंकर विदारक दृश्य पाहून त्यांच्या मनाला अत्यंत वाईट वाटले. तेव्हापासूनच मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या शिक्षकाने प्रयत्न सुरु केले.

मुलींच्या शिक्षणाविषयी संदेश

घराघरांत जाऊन पालकांच्या भेटी घेऊन मुलींच्या शिक्षणासाठी विशेष आग्रह धरला. गावकरीदेखील राजी झाले. यानंतर मुलींची शाळेत पटसंख्या वाढवून १०० टक्के उपस्थिती त्यांनी टिकविली. या सर्व मुली शाळेत नियमित येतात की नाही..? याची गवळी सर दररोज पाहणी करीत होते. एखादी मुलगी शाळेत आली नाही, तर तिच्या घरी थेट जाऊन पालकांशी भेट ते घेत होते.

अनेक दिवस या शिक्षकाच्या पुढाकारात इथल्या शाळेत मुलींची पटसंख्या घटली नव्हती. मात्र, शिक्षकाची बदली झाल्यानंतर काय होणार? असा प्रश्न गवळी यांना सतावत होता. मुलं शाळा बाह्य ठरू नयेत, मुलींच्या शिक्षणाचे वाढलेलं महत्त्व पुन्हा कमी होऊ नये यासाठी ‘मुलींच्या शिक्षणाविषयीचे विविध संदेश गावातील सर्व घरांवर लिहिण्याची कल्पना सुचली. मात्र या गावातील बहुतांश ग्रामस्थ हे अशिक्षित असल्याने त्यांना घरावरील संदेश वाचताच येणार नाही, हे वास्तव देखील लागलीच त्यांच्या डोळ्यांसमोर आले.

असे झाले गाव गुलाबी

१५ ऑगस्ट, २०१७ ला भारतीय स्वातंत्र्य दिनी एक मोठी बैठक सर्व ग्रामस्थांची घेण्यात आली. यावेळी भिंतघर आदर्श गावासाठी व विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी देशातील पहिले गुलाबी शहर ( पिंक सिटी ) जयपूर च्या धर्तीवर भिंतघर गावात ‘एक गाव, एक रंग’ ही एक मोठी संकल्पना मांडली. या संकल्पनेतून गावातील प्रत्येक घराला महिला सबलीकरणाचा प्रतीक म्हणून ओळख असणारा ‘गुलाबी रंग’ देऊन मुलींच्या शिक्षणाचा, समानतेचा व स्वच्छतेचा ज्वलंत संदेश दिला.

शिक्षकांची बदली झाली तरीदेखील गावातील सर्व घरांच्या भिंतींना गुलाबी रंग देण्याने आपल्या घरांच्या गुलाबी भिंती पाहून मुलींना शाळेत पाठविण्याची व मुला-मुलींमध्ये भेदभाव न पाहता दोघांमध्ये समानतेची आठवण राहील व जातीभेदाच्या सर्व भिंती तोडून एकाच रंगाने आपण जगाला व देशाला आपल्या सर्वांच्या एकजुटीची ताकद दाखवू शकू. असे गावकऱ्यांना पटवून दिले.

यानंतर सर्वच ग्रामस्थांनी एक मताने आनंदाने होकार दिला. सर, आपण सांगाल, तसं आम्ही सर्व गांवकरी मिळून कार्य करायला तयार आहोत. असा एकमुखी आवाज ग्रामस्थांनी दिला. यानंतर उभे राहिले ऐतिहासिक भिंतघर.

गुलाबी गावात आदिवासी संस्कृती

विशेष म्हणजे, गावातील भिंतींना एकाच प्रकारचा रंग देण्यासाठी लोकसहभागातून पै-पै देऊन ग्रामस्थांनी मदत केली. यासाठी कुठलेही अनुदान घेतले नाही. गावांत रंगकाम करतांना प्रत्येक घराच्या भिंतींवर शालेय शिक्षणाचं महत्त्व सांगणारे संदेश लिहिण्यात आले. जुन्या म्हणी, वाक्प्रचार, सुविचार व संदेश यांनी घरांची शोभा आणखीनच वाढविली आहे. विद्यार्थी- तरुणांनी आकर्षक चित्रे काढून ती रंगवलेली आहेत.

गुलाबी गावातील स्वच्छ-मोकळे रस्ते, त्यावर रांगोळ्यांचा सडा, हिरवागार परिसर, सोबत शेणाने सारवलेलं अंगण आणि घरांच्या गुलाबी रंगांच्या आकर्षक भिंती गावात पाय ठेवल्यावरच इथलं वातावरण आपल्या मनात नवा उत्साह निर्माण करतं. भिंतघर या गुलाबी गावांत तुम्ही प्रवेश केला की तुमचं मन मोहून टाकतील अशा पद्धतीची ग्रामीण सजावट आणि आदिवासी संस्कृतीची ओळख देणारी सजावट आपणास प्रत्येक घराच्या बाहेर पाहायला मिळते.

गुलाबी रंग दिलेल्या या घरांच्या बाहेर लागलेल्या पणत्या असो, पक्ष्यांना ठेवलेल्या पाण्याच्या डिश असो, इथली लाकडाची दरवाजे, लोकरी पासून बनवलेले सजावटीचे साहित्य असेल किंवा अगदी औत पासून तर सुपडी पर्यंतच्या काड्यांपासून, लाकडांपासून बनवलेल्या वस्तू असतील, या सर्व वस्तू आपणांस आदिवासींच्या संस्कृतीची, इथल्या जीवनमानाची ओळख तर देतातच शिवाय याठिकाणी पुन्हा येण्याचे निमंत्रण देखील देतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या