Thursday, April 25, 2024
Homeनगरअश्लिल व्हिडिओ, मेसेज करून महिलेचा विनयभंग

अश्लिल व्हिडिओ, मेसेज करून महिलेचा विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

व्हॉट्सअ‍ॅपवर महिलेला अश्लिल व्हिडिओ, मेसेज करणार्‍या तरूणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. दिपू लक्ष्मणदास आहुजा (रा. गांधी रोड, सेक्शन 33, उल्हासनगर, मुंबई) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.

- Advertisement -

अहमदनगर जिल्ह्यातील एका महिलेस तिच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर अज्ञात व्यक्तीने अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून अश्लिल व्हिडिओ, मेसेज करून विनयभंग करत मानसिक त्रास दिला होता. त्या महिलेने सायबर पोलीस ठाणे गाठून 20 जानेवारी 2022 रोजी फिर्याद दिली होती. सायबर पोलिसांनी भादंवि 354 (अ), 354 (ड), 500 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांच्या पथकातील पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, अरूण सांगळे, वासुदेव शेलार यांनी गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचे नाव निष्पन्न केले. या पथकाने मुंबई येथे जावून आरोपी आहुजा याचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली. त्याने फिर्यादी महिलेला त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर अश्लिल व्हिडिओ, मेसेज केले असल्याची कबूली दिली. पोलिसांनी आरोपी आहुजाला अटक केली आहे.

सोशल मिडीयावरून घेतला नंबर

आपण सोशल मीडियावरील व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा अ‍ॅपवर अकाऊंट तयार करतो. त्यावर आपली माहिती भरतो. त्या माहितीमध्ये आपला मोबाईल क्रमांक टाकतो. नागरिकांनी अ‍ॅपवर भरलेली माहिती प्रायव्हसी लॉक न केल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकरता येत नाही. आरोपी आहुजा याने देखील फिर्यादी महिलेचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सोशल मीडियावरून प्राप्त केला होता. त्या नंबरवर अश्लिल फोटो, मेसेज करून फिर्यादीचा विनयभंग करत त्यांना मानसिक त्रास दिला होता. नागरिकांनी सोशल मीडियावरील अ‍ॅपवर भरलेली माहिती प्रायव्हसी लॉक करून ठेवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या