Thursday, April 25, 2024
Homeधुळेचुकीच्या शस्त्रक्रीयेमुळे महिलेचा मृत्यू ?

चुकीच्या शस्त्रक्रीयेमुळे महिलेचा मृत्यू ?

पिंपळनेर Pimpalner – वार्ताहर :

येथील महिलेचा प्रसूती प्रसंगी केलेल्या चुकीच्या शस्त्रक्रीयेमुळे मृत्यू झाल्याने पिंपळनेर व धुळे येथील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयत प्रसुत महिलेची आई सुरेखा मोरे यांनी केली आहे. तशी लेखी तक्रार पिंपळनेर पोलिसात देण्यात आली आहे.

- Advertisement -

तक्रारी अर्जात म्हटले आहे की, माझी मुलगी सुजाता सुदर्शन जाधव (रा. वरणगाव ता. भुसावळ) ही गरोदर होती. तिची माहेरी पिंपळनेर येथील एका खाजगी रूग्णालयात पाचव्या महिन्यापासून प्रसुतीपूर्व उपचार सुरू होते.

तिला दि. 24 ऑक्टोबर रोजी प्रसूतिवेदना सुरु झाल्याने रूग्णालयात दाखल केले. त्यांनी सर्व तपासण्या पूर्ण केल्यानंतर सिजर करावेच लागेल असे सांगितले. मात्र मी मुलीची नॉर्मल प्रसुतीचा आग्रह धरला. परंतू डॉक्टरांनी ऐकले नाही. रात्री आठ वाजता मुलगी सुजाताचे सिजर केले.

सुजाताला शुद्धीवर आल्यानंतर तिचे पोट दुखू लागले. डॉक्टरांना सांगितल्यानंतर त्यांनी सिजरमुळे दुखत असेल असे सांगून. औषधोपचार सुरू केला. मात्र वेदना कमी झाल्या नाहीत. मात्र तिचे पोट फुगू लागले.

दि. 26 रोजी मुलीचे पोट अधिकच फुगले पोटाचा घेर वाढत गेला. त्यामुळे पुन्हा सोनोग्राफी केली. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी धुळे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार दि. 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत दाखल करून उपचार घेतले. परंतू तरीही सुजाताला बरे वाटले नाही.

त्यामुळे दोन्ही डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. दि. 6 नोव्हेंबर रोजी तिला घाटी रुग्णालयात दाखल केले.

तेथील डॉक्टरांनी त्वरीत ऑपरेशन करण्याचे सांगितले. दि.7 रोजी ऑपरेशन केले. मात्र दि.8 रोजी सकाळी सुजाताचा मृत्यू झाला. दरम्यान पिंपळनेर येथील डॉक्टरांनी प्रसूतीपूर्वी केलेल्या ऑपरेशनावेळी काही चुका केल्याने तिचे पोट फुगले. तेथूनच तिची प्रकृती खालावली.

धुळे येथील डॉक्टरांनी 80 हजार रुपये बिल घेतले व औषधे, तपासणीचे 60 हजार रुपये व पिंपळनेर येथील डॉक्टराने 50 हजार घेतले. मात्र बिल दिले नाही.

एवढे करूनही मुलीचा जीव वाचला नाही. तिघा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या डॉक्टरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुरेखा यशवंत मोरे यांनी तक्रारी अर्जाव्दारे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या