Saturday, April 27, 2024
Homeनगर'बुलाती है मगर जाने का नहीं' ; लिफ्ट मागून लुबाडणार्‍या महिलेची दहशत

‘बुलाती है मगर जाने का नहीं’ ; लिफ्ट मागून लुबाडणार्‍या महिलेची दहशत

अहमदनगर –

वाहन चालकांना लिफ्ट मागून त्यांच्याकडेच पैशाची मागणी करणारी व पैसे न दिल्यास खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार्‍या महिलेला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

सुनिता भाऊसाहेब भगत (वय 43 रा. काळे वस्ती जेऊर ता. नगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

दिल्लीगेट ते एमआयडीसी दरम्यान दुचाकी, चारचाकी वाहनचालकांकडे लिफ्ट मागून सुनिता भगत ही महिला त्यांच्याकडे पैशाची मागणी करत असे. पैसे दिले नाही तर कधी कोणाच्या तरी मोठ्या व्यक्तीची ओळख अथवा स्वतः वकील असल्याचे सांगून लिफ्ट देणार्‍याला दमदाटी करत होती.

बदनामीच्या भितीने वाहन चालक तिला पैसे देत असे. परंतू, काही लोकांच्या सर्तकतेमुळे तिचा हा प्रकार उघडकीस आला. तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकाने सुनिताला अटक केली. फसवणूक झालेले विजय किसन चौधरी (रा. सिव्हील हाडको, नगर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

गुढीपाडव्याच्या (मंगळवारी) दिवशी दुपारी विजय चौधरी त्यांच्या टेम्पोमध्ये फर्निचर सामान घेऊन नगर-मनमाड रोडने एमआयडीसीकडे जात होते. यावेळी रस्त्यावर सुनिता भगत उभी होती. या दरम्यान सुनिताने चौधरी यांच्याकडे हुंडेकरी शोरूमजवळ सोडण्याची विनंती केली. यावेळी चौधरी यांनी टेम्पोमध्ये मागे फर्निचर असल्याने टेम्पोच्या पुढील सीटवर तीला बसवले.

यानंतर हंडेकरी शोरूम आल्याने सुनिताला उतारा असे चौधरी म्हणाले. सुनिता त्यांना म्हणाली, मी कुणाच्या गाडीत फुकट येत नाही, असे म्हणून सुनिताने त्यांना 500 रुपयाची नोट दाखवली. 500 रुपये सुट्टे नसल्याचे चौधरी यांनी तिला सांगितले. यावर सुनिताने चौधरी यांना शिवीगाळ करत तू जर मला पैसे दिले नाही तर मी माझे माणसे येथे बोलवते, मी कोर्टात ‘क्लास वन ’अधिकारी आहे, असे म्हणाली.

शिवीगाळ, दमदाटी करून सुनीताने चौधरी यांच्याकडून एक हजार 700 रुपये काढून घेतले. सदरची घटना चौधरी यांनी एका मित्राला सांगितली. मित्राच्या मदतीने चौधरी यांनी उपनिरीक्षक सोळुके यांना माहिती दिली. उपनिरीक्षक सोळुंके यांच्या पथकाने सुनिताचा माळीवाडा बस स्थानक परिसरातून ताब्यात घेतले.

सदर महिलेला तोफखाना पोलीस ठाण्यात आणले असता तेथे तक्रार देण्यासाठी आलेले शांतीलाल भंडारी यांनी याच महिलेने मला फसविले असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सुनिता विरोधात जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास उपनिरीक्षक सोळुंके करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या