Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापरवानगी नसताना बसविला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

परवानगी नसताना बसविला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

येवला

तालुक्यातील राजापूर येथील चौफुलीवर अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवला. ही बाब समजताच अधिकाऱ्यांनी धाव घेत संभाव्य तणाव टाळण्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा केली.

- Advertisement -

राजापूरकरांनी सामंजस्य दाखविल्याने प्रशासनाने हा पुतळा सुरक्षित स्थळी हलविला.

दरम्यान सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवला नांदगाव मार्गावरील येवला तालुक्यातील राजापूर येथील वर्दळीचा असलेल्या चौफुलीच्या रस्त्याच्या कडेला लोखंडी चबुतऱ्यावर तयार करून आणलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री ठेवण्यात आला होता. हा प्रकार शनिवारी दिनांक २१ सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच एकच खळबळ उडाली होती. येथे पुतळा बसविण्या संदर्भात कुठलीही चर्चा किंवा नियोजन नसताना, अचानक पुतळा कोणी बसविला, याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला.

तसेच यामागचा हेतू काय असावा, याची उत्सुकता ताणली गेली. हा प्रकार समजताच तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी हे फौजफाट्यासह राजापूर येथे दाखल झाले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधीक्षक समीर सिंग साळवे व तहसीलदार प्रमोद हिले यांनी ही गावात येऊन ग्रामस्थांना समजावत शांततेची भूमिका घेण्यासाठी पुढाकार घेतला. ग्रामस्थांचे पुतळा बसविणे बाबत कुठलेही दुमत नव्हते. मात्र हा पुतळा रस्त्याच्या कडेलाच चौफुलीवर असल्याने त्याला कधीही वाहनाचा धक्का लागून काही गैरप्रकार घडण्याची भीती असल्याने, यावर निर्णय घ्यावा, अशी ग्रामस्थांची भूमिका होती. माजी सरपंच प्रमोद बोडके, ज्येष्ठ नेते परसराम दराडे, दयानंद जाधव, लक्ष्मण घुगे, पोपट आव्हाड, समाधान चव्हाण, विठ्ठल मुंडे, शरद वाघ, शंकर मगर, संजय वाघ, ग्रामविकास अधिकारी रामदास मंडलिक आदींनी मध्यस्थाची भूमिका घेऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुतळ्या बाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी केली.

एकमताने निर्णय

अखेर चर्चेअंती एकमताने हा पुतळा येथून सुरक्षितस्थळी हलविण्यात आला. हा पुतळा येवले येथील महात्मा फुले नाट्यगृहाच्या आवारात ठेवण्यात आला आहे. कारण या पुतळ्याची उंची जास्त असल्याने कुठल्याही कंपाउंडमध्ये आणि गेटमधून पुतळा आत जात नव्हता. त्यामुळे हा पुतळा आता महात्मा फुले नाट्यगृहाच्या आवारात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. गावात पुतळा बसविण्यास ग्रामस्थांचा विरोध नाही, मात्र चर्चा न करता रात्रीतून पुतळा बसविला जातो, ही आश्चर्याची बाब असल्याची भावना राजापूरकर यांनी व्यक्त केली. तूर्त येथे राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या