Friday, April 26, 2024
Homeनगरविना मास्क फिरणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात

विना मास्क फिरणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरासह जिल्ह्यात करोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. करोना धोका वाढत असतानाही काही व्यक्तींकडून नियमांचे पालन केले जात नाही.

- Advertisement -

सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क लावा. अशा सूचना प्रशासनाकडून वारंवार दिल्या जात आहेत. तरीही लोक या सुचनांचे पालन करताना दिसत नाही. यामुळे महापालिका व शहर पोलिसांकडून यांच्या संयुक्त पथकाकडून सुरूवातीपासून दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. कारवायांची ही मोहीम रविवारी अधिक गतिमान करण्यात आली.

शहरातील रस्त्यावर मास्क न लावणार्‍या वाहनचालकांवर महापालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई करण्यात येत होती. तोंडाला मास्क नसल्यास महापालिकेकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात येत होता.

जर, एखाद्या व्यक्तीने दंड भरण्यास नकार दिला तर त्याच्याविरुद्ध भादंवि 188 नुसार गुन्हा दाखल केला जात होता. यापूर्वीच मिशन बिगिन अगेन अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध बाबींना जिल्ह्यात परवानगी दिली आहे.

मात्र, त्याचबरोबर करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळेच महानगरपालिका क्षेत्र आणि प्रत्येक तालुक्यात अधिकाधिक चाचण्या घेऊन रुग्णांपर्यंत पोहोचावे आणि संसर्गाची साखळी तुटावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासंदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

त्याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क अवश्य लावा. आजाराची लक्षणे आढळताच तात्काळ जवळच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये जाऊन तपासणी करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

करोना चाचण्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याने विविध बाबींना जिल्ह्यात परवानगी दिली आहे. परवानगी दिली असली तरी कोव्हिड प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासन वेळोवेळी देत आहे.

परंतु, नागरिक नियम पाळत नसल्याने मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. करोना रुग्णांचे प्रमाण नगर शहरात मोठेआहे. शहरातील चौकात, बाजारपेठांमध्ये सण उत्सव काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे सामूहिक संसर्गाचा धोका वाढला आहे. यामुळे महापालिका व शहर पोलिसांनी मास्कचा वापर न करणार्‍यांवर ही कारवाई अधिक गतिमान केली आहे.

मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे अशा व्यक्तीविरूद्ध दंडात्मक कारवाई सुरूवातीपासून सुरू आहे. यासाठी महापालिकेची सहा पथके काम करत आहे. शहर पोलिसांची मदत घेतली जात आहे. ज्या ठिकाणी गर्दी होत आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौकात ही कारवाई केली जाते. एखाद्या व्यक्तीवर कारवाई केली. पुन्हा तोच व्यक्ती मास्क न लावलेल्या अवस्थेत आढळून आला तर त्याची दंडाची रक्कम वाढविण्यात येते. वारंवार एखाद्या व्यक्तीकडून मास्क लावले गेले नाही तर त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला जातो.

– श्रीकांत मायकलवार (आयुक्त, महापालिका)

- Advertisment -

ताज्या बातम्या