Wednesday, April 24, 2024
Homeनगरशेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेणे शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा विजय - ना. थोरात

शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेणे शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा विजय – ना. थोरात

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे केले होते. करार शेतीचा कायदा केला होता. त्याविरुद्ध पंजाब हरियाणातील शेतकर्‍यांनी आंदोलन केले. त्यांचे रस्ते केंद्र सरकारने अडविले. रस्त्यात खिळे ठोकले. मात्र शेतकरी आंदोलनाचा विजय झाला. पाच राज्याच्या निवडणुका जवळ आल्या तसेच शेतकरी, कामगार विरोधात गेल्याचे व लोक बाहेर फिरू देणारे नाही हे लक्षात आल्याने मोदी सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेतले, हा शेतकर्‍यांच्या अभूतपूर्व आंदोलनाचा विजय आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने शेतकरी विजय दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थायी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील, रामहरी कातोरे, गणपत सांगळे, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, प्रभाकर कांदळकर, साहेबराव गडाख, अजय फटांगरे, इंजि. सुभाष सांगळे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, अध्यक्ष तुकाराम दिघे, रामदास वाघ, बाबा ओहोळ, नामदेव दिघे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, भारत मुंगसे, बेबी थोरात, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, बाळासाहेब गायकवाड, आंनद वर्पे, सचिन दिघे, अनिल कांदळकर, मधुकर दिघे, बाळासाहेब दिघे, ज्ञानदेव शेळके, नवनाथ जोंधळे, आत्माराम जगताप, मतीन शेख, अमोल दिघे, भाऊसाहेब दिघे आदी उपस्थित होते.

महसूलमंत्री थोरात म्हणाले, काही धनदांडग्यांना ताकदवान बनवायचे, त्यांनी प्रचंड पैसा कमवायचा व त्यावर राजकारण सुरु ठेवायचे. त्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे केले होते. मात्र अभूतपूर्व शेतकरी आंदोलनापुढे मोदी सरकारला झुकावे लागले असेही ते म्हणाले. ठराविक लोकांसाठी लोकांसाठी देश चालविण्याचे काम चालू आहे. खुप आश्वासने देवून मोदी सरकार सत्तेवर आले. धनदांडग्यांसाठी सत्ता वापरायची. त्यांना ताकतवान बनवायचे व त्यांच्यावर निवडणुका करायच्या आणि पुन्हा सत्तेत जायचे त्यासाठी धर्माचा आधार घ्यायचा. फक्त सत्तेवर जाण्यासाठी धर्माचा आधार घ्यायचा.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, देशात लोकशाही पेक्षा, शेतकर्‍यांपेक्षा कुणी मोठा नाही. शेतकर्‍यांच्या हिताविरुद्ध तीन कृषी कायदे करण्यात आले. शेतकर्‍यांना गुलाम करणारे कायदे करण्यात आले होते. शेतकर्‍यांच्या गेलेल्या बळीचे मोदी कसे परिमार्जन करणार? शेतकर्‍यांच्या बलिदानाची किंमत मोदींना चुकवावी लागेल, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी शेतकरी आंदोलनात बलिदान दिलेल्या शेतकर्‍यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेतकरी आंदोलन यशस्वी करणार्‍या शेतकरी नेत्यांचे व आंदोलक शेतकर्‍यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, इंजि. सुभाष सांगळे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे यांची भाषणे झाली. प्रास्तविक महेंद्र गोडगे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सचिन दिघे व संपत दिघे यांनी केले.

कंगणाच्या वक्तव्याचा घेतला समाचार

महसूलमंत्री थोरात म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीवर ‘तिने’ बोलावे ही तिची पात्रता नाही, हे बोलणे वेडेपणाचे आहे. तिला त्रास होवू नये म्हणून लगेच पोलीस संरक्षण. लगेच पद्मश्री मिळतो. जिथे जिथे जगात चळवळ चालते, तिथे महात्मा गांधीचे नाव घेवून चळवळ चालते. पुन्हा गोखले त्यांना पद्मश्री व्हायचे दिसते, असा समाचार घेत राष्ट्रपिता महात्मा गांधींविरुद्ध बोण्याचा अधिकार कुणाला नाही., आज स्वातंत्र्यावर बोलले. उद्या राज्य घटनेवर बोलतील. यामागे कुणाचा तरी मेंदू काम करतोय. देश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेप्रमाणेच चालवावा लागेल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या