Thursday, April 25, 2024
Homeनगरपत्नीस आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या पतीस सहा वर्षे सक्तमजुरी

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या पतीस सहा वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती स्वप्नील रामकृष्ण भोईटे (वय 23 रा. जयमंगलनगरी, डॉन बॉस्को, सावेडी) याला सहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी ठोठावली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ए. बी. चौधरी यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.

- Advertisement -

स्वप्नील भोईटे याने पत्नीस विवाहानंतर दोन महिने व्यवस्थित नांदविले. त्यानंतर नवीन दुचाकी घेऊन येण्यासाठी माहेरावरून एक लाख रुपये आणण्यासाठी छळ सुरू केला. तिचा शारिरीक व मानसिक छळ करून तिस वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करत होता. या छळास कंटाळून तिने दिनांक 15 जुलै 2015 रोजी घरातील छताच्या पंख्याला रस्सी अडकवून त्यास गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्नील भोईटेविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एन. काळे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्यावतीने सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यामध्ये मयताचे वडिल फिर्यादी, वैद्यकिय अधिकारी, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. स्वप्नील यास हुंड्यासाठी छळ केल्याबद्दल दोषी धरून दोन वर्षे सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिने शिक्षा, आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सहा वर्षे सक्त मजुरी व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दीड महिना सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. पोलीस हवालदार प्रबोध हंचे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या