Friday, April 26, 2024
Homeनगरगव्हाच्या चपात्यांपेक्षा ज्वारीची भाकरी महागणार

गव्हाच्या चपात्यांपेक्षा ज्वारीची भाकरी महागणार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

शेतकर्‍यांनी रब्बी हंगाम आता आटोपता घेतला आहे. आणखी तीन महिन्यानंतर खरीप हंगामाची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांची काढणीची लगीनघाई सुरू आहे. ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक असले तरी यंदा मात्र हरभरा आणि सोयाबीनने या पिकाची जागा घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात राहुरी तालुक्यात ज्वारीचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यामुळे बाजारपेठेत गव्हापेक्षाही ज्वारी जादा भाव खात असल्याने गव्हाच्या चपात्यांपेक्षा आता ज्वारीची भाकरी महाग होणार असल्याचे चिन्ह आहे. पर्यायाने गरीबांचा अन्नदाता असलेली ज्वारी महागाईच्या विळख्यात सापडली आहे.

- Advertisement -

सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा ही पिके काढणीला आलेली आहेत. कडाक्याच्या उन्हात आणि ढगाळ हवामानाच्या भितीमुळे शेतकरी जलदगतीने काढणी करीत असल्याचे चित्र आहे. मात्र, राहुरी तालुक्यात गहू, हरभरा, कांदा आणि उसाचे क्षेत्र वाढलेले असतानाच ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्रात कमालीची घट झालेली दिसून येत आहे. पर्यायाने ही गरीबांची ज्वारीची भाकरी महागणार आहे. खरीप हंगामात निघणार्‍या बाजरीच्या क्षेत्रातही घट झाल्याने बाजरीचीही भाकरी महागली आहे. आता ज्वारीच्या भाकरीनेही गरीबांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत रब्बी हंगामातील पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात आली असून ज्वारी पिकाची काढणी देखील सुरू झाली आहे.

मात्र, राहुरी तालुक्यात अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल, एवढ्याच शेतकर्‍यांनी ज्वारीचे पीक केले आहे. त्यातच मजुरीच्या दरात वाढ आणि पावसाची धास्ती यामुळे शेतकरी कुटुंब रात्रीचा दिवस करुन शिवारात राबताना दिसत आहे. सध्या तालुक्यात सुगीची लगबग सुरु झाली असून ढगाळ वातावरणाच्या सावटाखालीच ज्वारी पिकाची काढणी सुरु आहे. पूर्वी ज्वारी ही उपटून काढली जात होती. तर निसर्गाचा लहरीपणा पिकावर बेतू नये म्हणून आता ज्वारीची देखील कापणी होत आहे. सध्या बाजारपेठेत ज्वारीला 2 हजार 500 ते 3 हजार रुपये दर मिळत आहे.

मात्र, हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तविली आहे. त्यामुळे बाजारभावाच्या बाबतीत ज्वारी यंदा गव्हालाही मागे टाकणार असल्याचे चिन्ह आहेत. तर यंदा ज्वारीचे उत्पादन घटल्यामुळे अधिकचे दर मिळतील, अशी आशा शेतकर्‍यांना वाटत आहे. त्यामुळे शेतकरी काढणी झाली की लगेच पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करत आहेत. जे खरीप हंगामत झाले त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उत्पादनाची सुरक्षा ही महत्वाची आहे. तर या बदललेल्या वातावरणामुळे ज्वारीची कणसे काळवंडण्याचा धोका असतो. त्यामुळे काढणी, मोडणी झाली की लागलीच मळणी कामे उरकून पीक पदरात पाडून घेण्याचा सल्ला कृषीतज्ज्ञांकडून शेतकर्‍यांना देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या