संगमनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

jalgaon-digital
2 Min Read

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये सततचा पाऊस पडून सोयाबीन पिकासह सर्व खरीप पिके वाया गेली आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून तातडीने भरीव मदत मिळावी व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

संगमनेरचे प्रांताधिकारी कार्यालय येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना भरीत मदत मिळावी, यासाठी आंदोलन करत निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, रामहरी कातोरे, लक्ष्मणराव कुटे, नवनाथ अरगडे, संपतराव डोंगरे, अजय फटांगरे, निखिल पापडेजा, नितीन अभंग, संतोष हासे, विजय राहणे, राजेंद्र चकोर, आनंद वर्पे, बादशहा वाळुंज, जावेद शेख, जयराम ढेरंगे, संतोष नागरे, सुनील कडलग आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणात असलेले सोयाबीन पीक व इतर खरीप पिके वाया गेली आहेत. याचा मोठा आर्थिक फटका तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना बसला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व गावांमधील सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाकडून तातडीने भरीव मदत या शेतकर्‍यांना द्यावी, अशी काँग्रेसची आग्रही मागणी आहे.

सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा एक परिवार म्हणून राज्यात ओळखला जातो. यावर्षी तालुक्यात सततच्या पावसाने सोयाबीनसह सर्व खरीप पिके वाया गेली आहेत. नुकसानग्रस्त सर्व शेतकर्‍यांना शासनाकडून तातडीने भरीव मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. इंद्रजीत थोरात म्हणाले, सरसकट पंचनामे करावेत ही आमची मुख्य मागणी असून सरकारने फक्त घोषणा न करता ही मदत शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत.

याप्रसंगी रामनाथ कुर्‍हे, तात्याराम कुटे, सचिन खेमनर, राजेंद्र खेमनर, शहाजी खेमनर, शिवाजी गोसावी, अक्षय दिघे, राजेंद्र थोरात, हृतिक राऊतसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सरकारविरोधी घोषणा देत ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. याप्रसंगी प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांनी निवेदन स्वीकारले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *