Saturday, April 27, 2024
Homeनगरसरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा- जवरे

सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा- जवरे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सन 2022 च्या खरीप हंगामात राज्यभरात जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. सप्टेंबर महिन्यात आजअखेर मागील कित्येक वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडल्याने खरीप हंगामातील अति पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे यांनी केली आहे.

- Advertisement -

जून महिन्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणावर खरिपाची पेरणी होऊन चांगल्याप्रकारे पिके बहरली होती. परंतु इतर वर्षाच्या तुलनेत सरासरी पेक्षा जास्त पाऊस होऊन जमिनीतील पाणी पातळी पूर्ण होऊन जमिनीपर्यंत उंचावले आहे. दररोज भाग बदलत सातत्याने पर्जन्यवृष्टी होत असून संपूर्ण पिके पाण्याखाली गेली आहेत. अति पावसामुळे कापूस, सोयाबीन, भात, मका, बाजारी, तूर, मूग व इतर पिकासह फळ पिकांमध्ये द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, संत्रा, केळी, पेरु आदी पिकांत पाणी साचल्याने पिकांची मुळे सडून प्रचंड नुकसान झाले आहे.

राज्यात नुकसानीची तीव्रता जास्त आहे. शेतकर्‍यांच्या हातून जवळपास हंगाम वाया गेल्यातच जमा आहे. शासनाने तात्काळ शेतकर्‍यांची कर्ज वसुली थांबवावी, महसूल व कृषी विभागाकडून सध्या सुरू असलेले पंचनामे ठराविक लोकांचे केले जात असल्याचे निदर्शनास येत असून त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ठराविक लोकांचे पंचनामे न करता सरसकट शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करुन केंद्र व राज्य सरकार नैसर्गिक आपत्ती निवारण निधीतून शेतकर्‍यांच्या पिकांना भरीव नुकसान भरपाई देवून आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना रब्बी हंगाम उभा करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी, असे जवरे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या