Friday, April 26, 2024
Homeजळगावबरं झाल ‘गुलाब’ हा दिवस पाहण्याआधी मी स्वर्गाच्या वाटेवर निघून गेलो...!

बरं झाल ‘गुलाब’ हा दिवस पाहण्याआधी मी स्वर्गाच्या वाटेवर निघून गेलो…!

प्रिय,
गुलाब मला वर ढगात जाऊन आज बरोबर चौदा दिवस झाले व तुला परम आदरणीय श्रध्देय मुख्यमंत्री ना.उध्दव साहेबांची साथ सोडून आठ दिवस झाले. तुला ‘प्रिय’ म्हणाव की नाही हा मला पडलेला प्रश्‍न आहे, परंतू जगाची रित आहे म्हणून मी ‘प्रिय’ हा शब्द येथे वापरतोय… गुलाब मला चांगल आठवतय तु पाळधी ता.धरणगाव या छोट्याशा गावात पानठेला चालवायचा. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तू हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचाराने पेटून उठला ते गेल्या आठवड्यापर्यंत. तू मला मोठा भाऊ गुरू मानायचा, माझ्यामुळे तुला १९९५ ला विधान सभेचे तिकीट मिळाले हे तू चार चौघात सांगायचा. साधा पान ठेला चालवण्यापासून ते राज्याचा पाणी पुरवठा मंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री झाला. तुझे यश व तो लवाजमा पाहून माझे उर भरून यायचे.

आणि हो १५ ऑगस्ट हा माझा जन्म दिवस तू कधी टाळला नाही, अगदी कॅबीनेट मंत्री असतांना देखील तु मला शुभेच्छा द्यायला न विसरता यायचा. तू शिवसेनेचा स्टार प्रचारक, नेते म्हणून तुला मान अगदी दसरा मेळाव्यातही तुझी तोफ धडधडायची. तुझ भाषण म्हणजे तरूणामध्ये जाज्वल्य निर्माण करित असे तु नेहमी म्हणायचा ‘कतलीयॉ कही साप बदल लेते है, पुण्य की आड मे पाप बदल लेते है, मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल देते है’ इतकेच नव्हे तर ‘इतरांसाठी सताराशेसाठ आमच्यासाठी एकच हृदयसम्राट’ असे परखड विचार ऐकून मला ही खूप हायस वाटायच माझा कार्यकर्ता माझ्या लहान भावाने इतकी उंची गाठली.
तु कितीही कामात असला तरी माझा फोन उचलायचा, वय व आजारामुळे मला स्पष्ट बोलता येत नव्हते तरी तु माझी भाषा समजून घ्यायचास इतकेच काय मी दिनांक १३ जून ला इहलोकाचा निरोप घेतला दुपारी १ वाजता. तुला कळताच तु सर्व हातातील कामे सोडून भुसावळच्या दिशेने धावत आला. माझे शव पाहून तुला अश्रु आवरेनासे झाले होते. हे प्रेम ही शिवसेनेची ताकद व आपल्या मैत्रीची घट्ट विण होती. मी स्वर्गात गेलो थोड स्थिर स्थावर होत नाही तोच दोन्ही कानात गरम जस्त ओतावे असे झाले व ‘गुलाबराव हे शिंदे गटात शामील’ असे वृत्त कानी आले मी तर थिजलोच. माझ्या शरिराचे भगवे रक्त आहे असे म्हणणारा गुलाब आज श्रध्देय उध्दव ठाकरे यांच्याशी प्रतारणा करेल असा विचारही मनाला शिऊ शकत नाही, परंतु तसे झाले.
तुम्ही म्हणता आम्ही शिवसेना सोडलेली नाही. स्व.बाळासाहेब व स्व.आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे नेत आहोत… असे हो पण हिंदूहृदसम्राटांनी ज्या उध्दवांच्या हातात शिवसेना दिली ती सोडून तुम्ही गेलात, मला तर मेल्याहून ही मेल्यागत वाटतय. आई एकवीरा तुम्हा सगळ्यांना सुबुध्दी देवो व भगव्या ध्वजाखाली तुम्ही सर्व उभे असावे उध्दवजींचा मान राखून, यातूनही मार्ग निघावा म्हणून भवानी मातेला साकडं घालण्याशिवाय दुसरं मी काहीच करू शकत नाही. शिवसैनिक तुझ्याकडे मोठ्या आशेने बघत आहे रे मित्रा… तुला माझी आण आहे, काही तर मार्ग निघू दे व तुम्ही सर्व सन्मानाने माघारी फिरा… नाही तर मला असेच म्हणावे लागेल ‘बर झालं गुलाब हा दिवस पाहण्याआधी मी स्वर्गाच्या वाटेवर दूर निघून गेलो…!’
– शब्दांकन
संजयसिंग चव्हाण, भुसावळ
मो.नं. ८००७०७२१२१

- Advertisment -

ताज्या बातम्या