Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यागणरायाचे वाजत गाजत स्वागत

गणरायाचे वाजत गाजत स्वागत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागील दोन वर्षांचा करोना संकटकाळ अनुभवल्यानंतर यंदाचा गणेशोत्सव ( Ganesh Festival-2022 )निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत आहे. गणेशभक्त ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो गणेश चतुर्थीचा काल दिवस उजाडला. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा उत्साहवर्धक घोषणा देत, ढोल-ताशांचा गजरात गुलालाची मुक्त उधळण करीत आज घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाचे मंगलमय वातावरणात स्वागत करण्यात आले. विधीवत पूजा करून गणेशमूर्तींची ( Lord Ganesh Idols ) प्रतिष्ठापना करण्यात आली.

- Advertisement -

यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असल्याने उत्सवावर अवलंबून असणारे मूर्तीकार, मूर्ती विक्रेते, ढोल-ताशा आदी वाजंत्री, पूजा साहित्य आणि सजावट साहित्य विक्रेते यांना मोठा आधार मिळाला आहे. आज प्रथमच सर्वत्र दिवाळीसारखा उत्साह पाहावयास मिळाला. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष दिवसभर आणि रात्रीपर्यंत सुरु होता. लहान-मोठ्या गणेशमूर्ती वाजत-गाजत घरी आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपात नेल्या जात होत्या.

गणेशोत्सवामुळे घरोघरी आनंदाला भरते आले आहे. नाशिक शहरात सुमारे 450 मोठ्या गणेशोत्सव मंडळाचे गणपती दोन दिवसांपूर्वीच आले. घरगुती गणपतीचे आगमन कालपासून सुरु झाले होते. आज सकाळापासून सायंकाळपर्यंत सगळीकडे ढोल-ताशांचा गजर ऐकू येत होता. बाप्पाच्या आगमनाने घराघरांत मंगलमय आणि भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. सार्वजनिक मंडळांनी आकर्षक सजावट केली आहे.

प्रबोधनात्मक देखाव्यांची कामेही बहुतेक मंडळांनी पूर्ण केली आहेत. पूजा-आरत्यांचे सूर 9 सप्टेबरपर्यंत सर्वत्र कानी पडणार आहेत. बाप्पासाठी मोदकांचा नैवेद्य, खिरापतीसह विविध प्रकारच्या प्रसादाची रेलचेल पाहावयास मिळणार आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा मोठा उत्साह शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत पाहावयास मिळत आहे.

सकाळपासूनच श्रींच्या मूर्ती व पूजा साहित्य खरेदीसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. फुले, फळे, धूप, दीप, प्रसाद तसेच सजावट साहित्य विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले होते. नाशकातील रविवार कंरजा, अशोक स्तंभ, पंचंवटी कारंजा, नवीन नाशिकचा शिवाजी चौैक, स्टेट बँक, त्रिमूर्ती चौक, सातपूर येथील शिवाजी मंडई, नाशिकरोडचा बिटको चौक, द्वारका येथे गणेशभक्तांचा उत्साह ओंसंडून वाहत होेता. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरु होती. दुपारी थोडा वेळ पावसाचा शिडकावा झाला. मात्र भक्तांंच्या उत्साहापुढे पावसाने माघार घेतली.

दिवाळीचा माहोल

करोनामुळे मागील दोन वर्षांपासून गणेशोत्सवासह विविध सण-उत्सवांवर निर्बंधांचे सावट होते. यंदा मात्र निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने लहान व्यापार्‍यांपासून मोठ्या व्यापार्‍यांंपर्यंत सर्वांना ‘अच्छे दिन’ अनुभवायला मिळत आहेत. गणेशोत्सवामुळे दोन महिने आधीच दिवाळी साजरी होत असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. भद्रकाली परिसर, शालिमार परिसर, छत्रपती शिवाजी रोड, महात्मा गांधी रोड, कानडे मारुती लेन, घाट परिसर, मेनरोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा यासह गंगापूररोड, कॉलेजरोड आदी भागातील रस्त्यांवर गणेशमूर्तीपासून सजावट, पूजा साहित्य आणि प्रसादाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. मंगळवारी रात्रीपासून गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या