Thursday, April 25, 2024
Homeनगरअखेर तो वजन काटा तपासायला अधिकार्‍यांची भागमभाग

अखेर तो वजन काटा तपासायला अधिकार्‍यांची भागमभाग

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारातील 50 टन क्षमतेच्या वजनकाट्यात तफावत होत असल्याची

- Advertisement -

तक्रार एका शेतकर्‍याने केल्याने वजनमापे नोंदणी विभागाने व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांनी भेट देऊन काटा तपासला. वजनकाट्याला क्लीनचिट दिली असली तरी शेतकर्‍याच्या मूळ काट्यातील तफावत काढण्यास चौकशी अधिकारीही असमर्थ ठरल्याने आडत व्यापारी व काटा ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

मंगळवारी श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागातील खिर्डी येथील सेवा संस्थेचे अध्यक्ष शनैश्वर पाराजी पवार यांनी 238 किलोची प्लेट काट्यात तफावत असल्याची तक्रार केल्याने वजनमापे निरीक्षकांनी टाकळीभान उपबाजारला भेट दिली.

मंगळवारी रात्री 8 वाजताच वजनमापे नोंदणी विभागाचे पथक दाखल होऊन त्यांनी बाजार समितीचा प्लेटकाटा व आडते व्यापार्‍याचा वजन काटा तपासून दोन्ही ठिकाणची वजने योग्य असल्याची क्लीनचिट दिली. त्यानंतर आज बुधवारी श्रीरामपूरचे सहाय्यक निबंधक लकवाल यांनी उपबाजारला भेट देऊन तपासणी केली.

बाजार समितीच्या प्लेट काट्यावर 20 किलो वजनाची मापे ठेवून तपासले असता 50 मापे टाकल्यावर 990 किलो वजन काट्याने दर्शवले. त्यानंतर तक्रारदार शेतकर्‍याने व्यापार्‍याला विकलेल्या 33 गोण्यांचे वजन त्याच व्यापार्‍याच्या काट्यावर केले असता ते 1 हजार 795 किलो भरले. त्या वजन केलेल्या 33 गोण्या एका वाहनात भरून बाजार समितीच्या प्लेटकाट्यावर वजन केल्या असता 1 हजार 800 किलो वजन भरल्याने त्यांनीही काटा प्रकरणाला क्लीनचिट दिली आहे.

काटा प्रकरणाला या अधिकार्‍यांनी क्लीनचिट दिलेली असली तरी मंगळवारी बाजार समितीच्या प्लेटकाट्यावर शेतकर्‍याच्या मालाचे भरलेले 1 हजार 670 किलो वजन व आडत व्यापार्‍याकडे भरलेले 1 हजार 908 किलो वजन यातील तफावत शोधण्यास त्यांना यश आले नाही.

आडत व्यापार्‍याने नजरचुकीने शेतकर्‍याच्या मालाच्या 33 गोण्या असताना 35 गोण्यांचे पेमेंट केल्याचे समर्थन सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे केले गेले. तर उर्वरीत कमी पडणार्‍या वजनाबाबत बाजार समितीचा ठेकेदार काटा क्लार्क याच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचे समर्थन बाजार समितीकडून करण्यात आले.

या प्रकरणात आडत व्यापारी व बाजार समितीचा काटा क्लार्क ठेकेदार या दोघांचाही हलगर्जीपणा झालेला आहे. वाहनाचा काटा करताना त्या काटा क्लार्कने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. काट्यावर सी.सी.टी.व्ही. गरजेचा असताना बसवलेला नाही. वजन घेत असताना वाहन प्लेटवर व्यवस्थित आहे का? हे पाहिलेले दिसत नाही. आज आडतदार व प्लेटकाटा तपासला असता त्यात तफावत आढळून येत नाही. आडतदाराने शेतकर्‍याच्या 33 गोण्या खरेदी केल्याचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले असता आढळून आले मात्र आडत व्यापार्‍याने 35 गोण्यांच्या वजनाची पट्टी अदा केल्याने तफावत दिसून आली. मात्र आज घेतलेली वजने दोन्ही काट्यावर समान भरली.

– श्री. लकवाल, सहाय्यक निबंधक, श्रीरामपूर

काटा ठेकेदार व आडत व्यापारी यांच्या हलगर्जीपणामुळे काल मंगळवारी झालेला प्रकार घडला आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे बाजार समितीची बदनामी झाली आहे. त्यामुळे या काटा ठेकेदार व आडत व्यापारी यांना नोटीस देऊन खुलासा मागवण्यात येईल. यापुढे असा हलगर्जीपणा करणार्‍यांचे परवाने रद्द करण्यात येतील.

– किशोर काळे, सचिव, श्रीरामपूर बाजार समिती.

- Advertisment -

ताज्या बातम्या