Thursday, April 25, 2024
HomeनगरVIDEO : आभासी शिक्षण पद्धतीमुळे समाजविकासापुढे आव्हान

VIDEO : आभासी शिक्षण पद्धतीमुळे समाजविकासापुढे आव्हान

अहमदनगर (प्रतिनिधी)-

शिक्षण हा घटनादत्त मुलभूत अधिकार आहे, हे स्वीकारायला आपणास सव्वाशे वर्षे लागली. मात्र गेल्या 10 वर्षात ज्या झपाट्याने शिक्षणाचे खासगीकरण सुरू झाले आहे, ते गरिबांच्या शिक्षण हक्कासामोर आव्हान उभे करणारे आहे. सध्या चर्चेत असलेली आभासी शिक्षण पद्धतीतून समाजविकासाचे मोठे आव्हान उभे होणार आहे. समाज, धुरीण आणि शिक्षक अशा सर्वांसाठीच हा चिंतनाचा विषय आहे, असे प्रतिपादन शिक्षण अभ्यासक हेमांगी जोशी यांनी केले.

- Advertisement -

सार्वमत-देशदूत वेब व्याख्यानमालेत जोशी यांनी सहावे पुष्प गुंफले. मुंबई येथून ऑनलाईन पद्धतीने या व्याख्यानमालेत सहभागी झालेल्या जोशींनी महाराष्ट्रातील शिक्षणाचा प्रारंभ, महात्मा ज्योतिबा फुलेंचे कार्य ते आधुनिक महाराष्ट्रात शिक्षणाची सुरू झालेली गळचेपी असा पट उलगडून दाखवला. त्या म्हणाल्या, भारतातील सार्वत्रिक शिक्षणाचा प्रारंभ हा इंग्रजांच्या गरजेतून झाला. त्यांना हिशेबासाठी हवे असलेले मनुष्यबळ यातून मिळाले. मात्र महात्मा फुल्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले होते. शिक्षण बहुजनांसाठी खुले व्हावे, यामागे त्यांचा समाज उभारणीचा हेतू होता. तो सर्वांचा हक्क असावा, ही मांडणीही त्यांचीच. मात्र त्यांचा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपल्याला एका दशकाची वाट पहावी लागली, यावरून शिक्षणाबाबत आपल्या गतीची कल्पना यावी.

शिक्षण हा मुलभूत हक्क असल्याचा कायदा करूनही ही व्यवस्था सरकारने उभी केली आहे का? या प्रश्नाचे उत्तर निराशाजनक आहे. सरकारी शाळा ही संकल्पना मुळात चौथीपर्यंतच रूजली. पुढील शिक्षण हे विविध संस्थांच्या शाळा किंवा अनुदानित शाळा याच मार्गातून गेले. या माध्यमिक शाळा जिल्हा, तालुका किंवा मोठ्या गावांपर्यंत मर्यादित राहिल्या. याचा फटका एका पिढीला बसला. आज खासगीकरणाचे पेव फुटले आहे. तंत्रज्ञानाचेही अतिक्रमण सुरू आहे. करोनाकाळात आपण याची उदाहरणे पाहिली. खासगीकरणाच्या गोंधळात ग्रामीण आणि गरिबांच्या शिक्षणाचे काय, याचे उत्तर व्यवस्था देत नाही. आभासी शिक्षण पद्धतीतून समाजविकासापुढे मोठे आव्हान उभे होणार आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम उद्धवतील, असे त्या म्हणाल्या.

प्रारंभी शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांनी त्यांचा परिचय करून दिला. दररोज सायंकाळी 7 वाजता वेब व्याख्यानमाला ऑनलाईन प्रसारित होत आहे.

दारिद्य्राची शोधयात्रा

आज रविवार, 30 मे रोजी लेखक व शिक्षण अभ्यासक हेरंब कुलकर्णी हे ‘दारिद्य्राची शोधयात्रा’ या विषयावर सातवे पुष्प गुंफणार आहेत. शिक्षण विकासासाठी धाडसी विचारमांडणीसोबत तळागाळातील शिक्षण व्यवस्थेवरील अभ्यासमांडणीसाठी ते प्रसिद्ध आहेत. दारूबंदी आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन या चळवळींच्या माध्यमातून समाज उन्नतीसाठी ते झटत असतात. नियोजन आयोगाच्या कार्यगटाचे ते माजी सदस्य आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या