Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगविणकर झाला वेटलिफ्टर

विणकर झाला वेटलिफ्टर

पश्चिम बंगालमधील देऊलपूर गावातील 20 वर्षीय अचिंता शेऊली याने बर्मिंगहॅम येथे पुरुषांच्या 73 किलो गटात क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये एकूण 313 किलो वजन उचलत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताला तिसरे सुवर्ण अचिंताने मिळवून देत देशाच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला.

दिनेश सोनवणे

पश्चिम बंगालमधील देऊलपूर गावातील 20 वर्षीय अचिंता शेऊली याने बर्मिंगहॅम येथे पुरुषांच्या 73 किलो गटात क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये एकूण 313 किलो वजन उचलत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताला तिसरे सुवर्ण अचिंताने मिळवून देत देशाच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला.

- Advertisement -

त्याच्या या यशाने हावडा येथे बसलेल्या भावाचे स्वप्नही पूर्ण झाल्याचे अचिंता म्हणाला. तो म्हणतो, माझ्या भावाने त्याची स्वतःची स्वप्ने मागे टाकून मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली, संधी दिली. त्याच्या या प्रेरणेने मी इथवर पोहोचल्याचे अचिंता सांगतो.

अचिंताचे वडील सायकल रिक्षा चालवायचे. नंतरच्या काळात त्यांचा एक कुक्कुटपालनाचा फार्मदेखील होता. पण एक दिवस त्या फार्मवर कोल्ह्यांनी हल्ला केला आणि तो आधारदेखील हरपला. हावड्यापासून दोन तासांच्या अंतरावर राहणार्‍या अचिंताच्या वडिलांचे 2013 मध्ये निधन झाले. घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. पण अचिंताला खेळासाठी तयार करण्याची जबाबदारी त्याच्या भावाने घेतली. त्याकाळात त्याचा मोठा भाऊ अलोक हा वेटलिफ्टिंग करायचा. अलोक प्रशिक्षणासाठी त्याच्या घराजवळील जिममध्ये जायचा. तिथे तो अचिंतालाही घेऊन जायचा.

मात्र, सुरुवातीला अचिंताला त्यात रस नव्हता. कुटुंब व घराचा खर्च भागवण्यासाठी आलोकने नंतर प्रशिक्षण सोडले आणि त्यानेही हावडा येथे शेतमजूर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पती निधनानंतर अचिंताच्या आईनेही विणकर म्हणून काम करायला सुरुवात केली. अचिंताने पदक जिंकल्यानंतर त्या माध्यमांना म्हणाल्या, परिस्थितीमुळे आपण अचिंताला कधीही सकस आहार देऊ शकलो नाही. एकदाच त्याने माझ्याकडे चिकन मागितले. पण परिस्थितीअभावी मी त्याला देऊ शकले नाही. त्या दिवशी तो खूप रडला. पण नंतर त्यालाच लक्षात आले आणि त्यानंतर त्याने कधीही माझ्याकडे पुन्हा चिकनचे जेवण मागितले नाही. मी त्याला नेहमीच खोबरे घातलेला भात खाऊ घालायचे.

पदक जिंकल्यानंतर तो म्हणाला, मी घरी येईल तेव्हा मला तुझ्या हातचा तोच भात खायचा आहे. मी त्याचीच वाट पाहत आहे. मोठा भाऊ अलोकने अचिंताला खेळ सोडू दिला नाही. त्यासाठी खूप कष्ट केले. पण अचिंताला खेळासाठी लागते ते सर्वकाही दिले. अलोकने अचिंताचे स्वप्न कायम जिवंत ठेवले. याकाळात अचिंताही रिकाम्या वेळेत काही न काही करून पैसे कमवत होता. तो आईसोबत भरतकाम (एम्ब्रॉयडरी) व शिवणकाम करत असे. त्या कामाचा मला फोकस करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी चांगलाच फायदा झाला, असे अचिंता म्हणतो.

त्या दिवसांची आठवण करून देताना अचिंता शेऊली सांगतो की, मी फक्त शाळेत जायचो, ट्रेनमध्ये जायचो, जेवण करायचो, खेळायचो आणि उरलेल्या वेळेत आईला भरतकामात मदत करायचो. वडिलांच्या मृत्यूच्या वेळी अलोक राष्ट्रीयस्तरावरील वेटलिफ्टर अस्तम दास यांच्याकडून प्रशिक्षण घेत होता. दास सरदेखील अचिंताचे सुरुवातीचे प्रशिक्षक होते. गरजू मुलांना कोचिंग देण्यासाठी त्यांनीदेखील नोकरी सोडली होती.

दास सरांनी अचिंताला मोफत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अचिंताबद्दल बोलताना दास सरांनी सांगितले की, अचिंता खूप सडपातळ होता. पण त्याची खेळण्याची जिद्द होती. त्यामुळेच त्याच्याकडे विशेष लक्ष दिले. दास सरांसोबत अचिंताने 2013 पासूनच स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती.

2014 मध्ये आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूटच्या चाचण्यांमध्ये अचिंता शिऊलीची निवड झाली तेव्हा आयुष्याला कलाटणी मिळाली.त्याने 2016 आणि 2017 मध्ये आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण सुरू ठेवले. 2018 मध्ये तो राष्ट्रीय शिबिरासाठी आला होता. 2018 मध्येच त्याने ज्युनिअर आणि सीनियर कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

2019 मध्ये अचिंताने वयाच्या 18 व्या वर्षी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 2021 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ सीनियर चॅम्पियनशिपमध्ये अचिंताने पहिला क्रमांक पटकावला होता.

आज अचिंता देशाचा प्रसिद्ध वेटलिफ्टर आहे. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या विजयाने त्याने हे सिद्ध केले की कठोर परिश्रम हा जीवनातील अडचणींवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

पदक जिंकल्यानंतर अचिंता म्हणाला, राष्ट्रकुल स्पर्धेत मला माझे सर्वोत्तम प्रदर्शन करायचे होते. मी हे करण्यात यशस्वी झालो. माझी कधीच कुणाशी स्पर्धा नव्हती. माझी स्पर्धा माझ्याशीच होती. मलेशियाचा खेळाडू मला झुंज देऊ शकला असता. पण मी ठरवले होते की, मला माझा सर्वोत्तम खेळ करून त्याला हरवायचेच. आता पुढील वर्षी होणार्‍या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही मी याच वजनी गटात सहभागी होईल. तेथेदेखील अशीच कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.

मागच्या वर्षी जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत अचिंताने रौप्यपदक जिंकले होते. मूळचा पश्चिम बंगालचा असणारा अंचिता याने स्नॅचमध्ये 143 किलोग्रॅम वजन उचलले, जो कॉमनवेल्थ गेम्समधील विक्रम ठरला आहे. तसेच क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये 170 किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण 313 किलो वजन उचलून कॉमवेस्थ गेम्सचा विक्रम स्वतःच्या नावावर केला.

त्याने तिसर्‍या प्रयत्नात ही जबरदस्त कामगिरी केली आहे. मलेशियाचा ई-हिदायस मोहम्मद याने रौप्यपदक पटकावले, तर कॅनडाचा शाद डारसिग्नी याने कांस्यपदक पटकावले. या दोघांनी अनुक्रमे 303 आणि 298 किलोग्रॅम वजन उचलले होते. अचिंता आता भारतीय सेनेत हवालदार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या