कोविड व ओमिक्रॉनच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देणगीसाठी साईबाबा हॉस्पिटलशी संपर्क करावा – बानायत

jalgaon-digital
2 Min Read

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

कोविड 19 ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभुमीवर करावयाच्या उपाय-योजनांकरिता नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडलेल्या आढावा बैठकीत केलेल्या सुचनांच्या अनुषंगाने कोविड रूग्णांकरिता व्हेंटीलेटर, लिक्वीड ऑक्सीजन प्लँट तसेच इतर वैद्यकीय साहित्यांची आवश्यकता आहे. या साहित्यांकरिता देणगी देऊ इच्छिणार्‍या साईभक्तांनी संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटल व जनसंपर्क कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले.

श्रीमती बानायत म्हणाल्या, नुकतीच नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली करोना व्हायरसच्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभुमीवर करावयाच्या उपाय-योजनांकरिता आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी सर्वप्रथम करोना विषयक कामकाजाचा आढावा घेवून श्री. गमे यांनी प्रति दिवस 5 हजार व्यक्तींपर्यंत आरटी-पीसीआर तपासणी क्षमता वाढविणे, जीनोम सीक्वेसिंग लॅब उभारणी करणे, दोन लिक्वीड मेडिकल ऑक्सीजन प्लॅट भाडेतत्वावर घेणे, साईआश्रम फेज 2 येथे कोविड रुग्णांकरिता सुमारे 300 खाटांचे ऑक्सीजन बेड वाढविणे, दोन लिक्वीड ऑक्सीजन प्लँट, व्हेंटीलेटर तसेच वैद्यकीय साहित्य व आवश्यक पायाभूत सुविधा देणगी स्वरूपात उपलब्ध कराव्यात. तसेच यापुढे श्री साईबाबा व श्री साईनाथ रुग्णालय हे दोन्ही नॉनकोव्हीड रुग्णालय म्हणून कार्यरत ठेवून संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी कोविड हॉस्पिटल साईआश्रम फेज 2 (साईधर्मशाळा) येथे सुरू करावे, अशा सूचना केल्या होत्या.

त्यानुसार साईआश्रम फेज 2 (साईधर्मशाळा) येथे कोविड हॉस्पिटल उभारणीचे काम सुरू असून याकामी आवश्यक असलेले 50 व्हेंटीलेटर, 10 लहान मुलांचे व्हेंटीलेटर, 02 लिक्वीड ऑक्सीजन प्लँट व 100 सिलेंडर, 100 जम्बो सिलेंडर, जीनोम सीक्वेसिंग लॅब उभारणी व ऑक्सीजन बेडकरिता ऑक्सीजन पाईपलाईन या व इतर वैद्यकीय साहित्यांची आवश्यकता आहे. तरी वरील कामासाठी इच्छुक देणगीदार साईभक्तांनी देणगीकामी श्री साईबाबा हॉस्पिटल व जनसंपर्क विभागाशी संपर्क साधावा, तसेच जास्तीत-जास्त देणगीदारांनी सढळ हाताने देणगी द्यावी, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *