Thursday, April 25, 2024
Homeनाशिकयेवल्यात पाच दिवसआड पाणीपुरवठा

येवल्यात पाच दिवसआड पाणीपुरवठा

येवला । प्रतिनिधी Yeola

येवला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गळती व उष्णतेमुळे बाष्पीभवनही वेगाने होत आहे. तसेच वेगाने पाणी आटत असल्याने योग्य नियोजनाअभावी नगरपालिकेने शहराला तब्बल पाच दिवसाआड म्हणजे सहाव्या दिवशी पाणी देणे सुरू केले आहे.

- Advertisement -

पाणीपुरवठा करणार्‍या तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात विहिरींची संख्या आहे. सुमारे 150 ते 200 विहिरींतून सतत पाणी उपसा सुरू असतो. त्यामुळे ही पाणीटंचाई जाणवते आहे. या तलावास काँक्रिटीकरण केल्यास शहराला बाराही महिने दररोज पाणीपुरवठा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

गत 26 मार्चच्या सुमरास पालखेड डाव्या कालव्यातून तलावात 60 दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा तलावासाठी करण्यात आला आहे. त्यावेळी सुमारे पावणेचार मीटरपर्यंत पाणी तलावात होते. मात्र सततच्या उपशामुळे महिन्यातच निम्म्याहून अधिक पाणीसाठा घटला आहे. याच्या कारणाकडे सर्रास डोळेझाक होत आहे. आजमितीस तळ्यात 1.75 मीटर इतकेच पाणी शिल्लक आहे. आठ- दहा दिवसांपूर्वी सव्वादोन मीटर पाणी शिल्लक होते. परंतु तलावातून होणारी गळती व आजूबाजूच्या विहिरीतून होणारा उपसा आणि बाष्पीभवनामुळे तलावाचा पाणीसाठा वेगाने खालावत आहे.

त्यातच जिल्हाधिकारी कार्यालयासह पालखेड पाटबंधारे विभागाने नगरपालिकेला पत्र देऊन अल निनो समुद्र प्रवाह सक्रियतेमुळे पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाळ्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याचा संभव असून पाण्याच्या बाष्पीभवनामुळे अधिक व्यय होऊन धरणांसह सर्वत्र वेगाने पाणीसाठा खालावू शकतो. या स्थितीचा विचार करता पालखेड कालव्याचे आगामी आवर्तन 10 जूननंतर देण्याचे नियोजन असल्याचे कळवले आहे. त्यामुळे तलावात असलेले पाणी काटकसरीने 15 जूनपर्यंत पुरवा, अशा सूचनाच उपकार्यकारी अभियंता राजेंद्र बधान यांनी केल्या आहेत. यामुळे नगरपालिकेने सावध पवित्र उचलून सोमवारपासून शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्याने आता आठवड्यातून एकदाच म्हणजे सहाव्या दिवशी पाणी मिळणार असल्याने पाणीटंचाईचे संकट शहरावर निर्माण झाले आहे.

टप्पा क्रमांक दोनच्या तलावासह जुन्या गंगासागर तलावातही काही पाणी आहे. तेदेखील उपयोगात आणले जाणार असून आज पालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख सत्यवान गायकवाड आदींनी दोन्ही तलावांची पाहणी करून पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांना काटकसरीने पाणी देण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, नागरिकांनी अतिशय जपून पाणी वापरावे, पाण्याचा अपव्यय टाळावा म्हणजे उपलब्ध पाणी अधिकाधिक दिवस पुरवता येईल, असे आवाहन मुतकेकर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या