Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यारामकुंडावर तळपत्या उन्हातही जलस्रोत जिवंत

रामकुंडावर तळपत्या उन्हातही जलस्रोत जिवंत

पंचवटी। प्रतिनिधी Panchavati

रामकुंडाच्या ( Ramkund ) काठावर स्वच्छ निर्मळ जलस्रोत (Water source )तळपत्या उन्हाळ्यातही जिवंत असल्याचे आढळून आले आहे. याचा अर्थ गोदावरी नदीतील ( Godavari River ) सर्व सिमेंट काँक्रिटचा तळ काढला तर नदीपात्रातील जिवंत जलस्त्रोतामुळे गोदावरी नदी बारमाही स्वच्छ पाण्याने प्रवाहित होऊ शकते, असे गोदाप्रेमींना वाटत आहे.

- Advertisement -

मागील काही दिवसापूर्वी स्मार्ट सिटीच्या कामाच्या वेळी ड्रेनेज लाइनसाठी गोदाकाठी खड्डा खोदला असता त्या ठिकाणी जिवंत पाण्याचे झरे आढळून आले होते. ते इतक्या मोठ्या प्रमाणात होते की त्या कामाच्या ठेकेदाराला विद्युत मोटारीच्या सहाय्याने चोवीस तास पाण्याचा उपसा केला तरी त्याचा स्त्रोत थांबत नव्हता. शेवटी पाणी उपसा करण्याचे सर्व प्रयत्न संपल्यानंतर नाईलाजास्तव तो खड्डा ठेकेदाराला बुजवावा लागला.

याचा अर्थ नदीपात्रातील सर्व सिमेंट काँक्रिटचा तळ काढला तर धरणातील पाण्याची देखील गरज भासणार नाही व गोदावरी नदी बारमाही जिवंत पाण्याच्या स्त्रोतानेच वाहत राहील. यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाने विशेष लक्ष घालून हे जिवंत पाणी आरक्षित व सुरक्षित करावे. कारण पाणी हे अमृत आहे. दुसर्‍या पिढीसाठी अशा पाण्याचे नियोजन करावे अशी मागणी होत आहे. जिवंत जलस्रोत चालू राहिल्यास खर्‍या अर्थाने राम कुंडातील पाणी तीर्थ म्हणून भाविकांना प्राशन करताना आनंद व समाधान मिळेल.

गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी हे अनेक दिवसापासून काँक्रीट तळ काढा अशी मागणी करुन,नदीपात्रात जिवंत बारमाही वाहणारे जलस्त्रोत आहेत याकडे लक्ष वेधत आहेत. या मागणीला महानगर प्रशासकांनी गांभीर्याने घ्यावे. लवकरात लवकर सिमेंट काँक्रीटचा थर काढून जिवंत पाण्याच्या स्त्रोतांचा मार्ग मोकळा करावा व भाविकांना स्वच्छ व निर्मळ पाण्याचा तीर्थ म्हणून उपयोग करून द्यावा अशी मागणी होत आहे.

भूजल सर्वेक्षण विभागाने यापूर्वी होळकर कुंडाजवळ ट्रायल बोअर केला असता 80 फुटावर पाणी लागले होते. विद्युत मोटारीच्या सहाय्याने पाणी उपसा केला असता एक मिनिटात 44 लिटर पाणी त्या बोअर मधून निघाले. उपसा बारा तास चालू ठेवून पडताळणी केली होती.

आम्ही जेव्हा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती तेव्हाच आम्ही सांगितले होते की, गोदावरी स्वावलंबी नदी आहे, तिला वाहण्यासाठी गंगापूर धरणाची आवश्यकता नाही. मात्र, नदीपात्रात काँक्रीटीकरण झाल्यानंतर गोदावरीतील जिवंत स्रोत बंद झाले. म्हणून धरणातून पाणी सोडल्यानंतर नदी प्रवाहित होऊ लागली. अधूनमधून नदीकाठी जिवंत स्रोत मिळत असतात. दुतोंडया मारुतीच्या पुढेही जिवंत स्रोत मिळून आले आहेत. मात्र नदीकाठी पहिल्यांदाच जिवंत स्रोत मिळाले आहेत. रामकुंडाच्या वरील बाजूस एक गोमुखाच्या पुढे आणि एक गोमुखाच्या पाठीमागे हे स्रोत मिळून आले आहेत. यामुळे काँक्रीटीकरण काढणे गरजेचे आहे.

– देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या