Saturday, April 27, 2024
Homeनगरसारसनगर, माळीवाड्यात ठणठणाट

सारसनगर, माळीवाड्यात ठणठणाट

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुळानगर येथील 725 हॉर्सपॉवरचा पंप बिघडल्याने शहर पाणी पुरवठ्याचे वेळपत्रकही बिघडले आहे. आज गुरूवारी सारसनगर, माळीवाडा, दाळमंडईसह शहराच्या मध्यवर्ती भागात पाणी पुरवठा न झाल्याने तेथे ठणठणाट पहावयास मिळला. उद्या शुक्रवारी पाणी पुरवठा होणार्‍या भागाला शनिवारी पाणी दिले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

रविवारी मुळानगर येथील 725 हॉर्सपॉवर पंप बिघडला होता. दुरूस्तीनंतर मंगळवारी तो पुन्हा बसविण्यात आला. शहराचा पाणी पुरवठा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच काल बुधवारी हा पंप पुन्हा बिघडला. महापालिकेने तातडीने पंप दुरूस्तीचे काम हाती घेतले मात्र पंप दुरूस्तीपर्यंत अपेक्षित पाणी उपसा होत नाही. परिणामी शहराचे पाणी पुरवठा वेळपत्रक बिघडले आहे.

- Advertisement -

आज गुरूवारी रोटेशननुसार मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळूबागवान गल्ली, धरती चौक, कोठी, माळीवाडा तसेच सारसनगर व बुरूडगाव रोड भागास होणारा पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे या भागात पाण्याचा ठणठणाट पहावयास मिळाला. या भागाला उद्या शुक्रवारी पाणी दिले जाणार आहे.

शुक्रवारी रोटेशननुसार सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्त गल्ली, कापड बाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड या भागाला पाणी पुरवठा होणार नाही. शनिवारी या भागाला पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

…………………

एक दिवस शहरात कपात करून उपनगराला

शहरातील पाणी पुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले असेल अशा भागात महापालिका पाणी पुरवठा करणार असल्याचे सांगण्यात आले. पाणी पुरवठा पूर्ववत होईपर्यत नगरकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या