Friday, April 26, 2024
Homeनगरकेवळ तांत्रिक सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा प्रस्ताव

केवळ तांत्रिक सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा प्रस्ताव

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाणी योजना खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्यात येणार नाही, तर समप्रमाणात संपूर्ण शहराला पाणी मिळावे, यासाठी तांत्रिक सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे, असा खुलासा महापालिकेने दिला आहे.

- Advertisement -

महापालिकेची पाणी योजना खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्यात येणार असल्याचा प्रस्ताव महापालिकेने सादर केला आहे, अशी माहिती समोर आली होती. यामुळे शहरात खळबळ उडाली. या प्रस्तावाला सत्ताधारी असलेल्या शिवसेनेसह काँग्रेसने विरोध केला. गेले काही दिवस हा गोंधळ उघड्या डोळ्यांनी पाहणार्‍या महापालिकेने अखेर यासंदर्भातील मौन सोडले असून, तसा खुलासा प्रसिद्धीस दिला आहे. खुलाशात म्हटले आहे, की शहर पाणी पुरवठा योजनेसह वितरण व्यवस्थेसाठी कार्यरत कर्मचारी वर्ग कमी प्रमाणात आहे.

त्यामुळे मुळा जलाशयातून शहरासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत असूनही शहरातील पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. त्यासाठी शहर पाणी योजना व वितरण व्यवस्था असे दोन भाग करून या दोन्ही टप्प्याचे संपूर्ण व्यवस्थापनासह खासगी एजन्सीमार्फत व्यवस्थापन करणे हितावह आहे. त्यासाठी हा विषय महासभेपुढे ठेऊन कार्यवाही करावी, असा प्रस्ताव प्रभाग समित्यांनी सादर केला होता.

याद़ृष्टीने नागरिकांना समप्रमाणात सुरळीत पाणीपुरवठा होणे कामी एखाद्या तांत्रिक संस्थेचे सहकार्य मिळाल्यास उपयोग होईल, असे मत व्यक्त केले आहे. अशा प्रकारे प्रस्ताव महासभेसमोर सादर करण्यास उपायुक्त, आयुक्त यांनी मंजुरी दिलेली आहे, असेही महापालिकेने खुलाशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या