Monday, April 29, 2024
Homeनगरवारली कलेतील रंगकामाने सजले कळसूबाईचे मंदिर

वारली कलेतील रंगकामाने सजले कळसूबाईचे मंदिर

अकोले |प्रतिनिधी| Akole

सार्‍या महाराष्ट्राचं दैवत असलेली आई कळसूबाई मातेच्या मंदिरावर आदिवासी अस्मितेचे प्रतीक मानल्या जाणार्‍या वारली चित्रकलेतील रंगकाम करून मंदिर साकारण्यात आले आहे. वारली कला चित्ररूपाने मंदिराच्या भिंतीवर अतिशय सुंदर पद्धतीने साकारण्यात आली आहे. तालुक्यातील वारली कला साकारणारे चित्रकार रमेश साबळे यांनी हे रंगकाम अतिशय सुंदर पद्धतीने केले आहे. हे वारली चित्रकाम भाविकांच्या पसंतीला उतरले आहे.

- Advertisement -

अकोले तालुक्यातील बारी-जहागीरदारवाडी या गावांच्या सीमेवर कळसूबाई मातेचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाणारे कळसूबाईचे शिखर नवरात्रीच्या उत्सवात भाविकांनी फुलून जाते. चालूवर्षी बारी व जहागीरदारवाडी येथील कळसूबाई तरुण मित्र मंडळाने पुढाकार घेत मंदिराचे सुशोभिकरण व स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. नवरात्रीनिमित्त नऊ दिवस या मंदिराला महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक भेट देतात. येथील निसर्ग हिरवाईने नटलेला असतो.

अतिशय मोहक वातावरण व मध्येच दाटून येणारे धुके असा निसर्गाचा वेगळा आविष्कार याठिकाणी बघायला मिळतो. कळसूबाईच्या पर्वत रांगेत बसलेली बारी- जहागीरदार वाडी ही टुमदार गावे व त्याच्या भोवतीची सुंदर हिरवीगार भात शेती सर्वांना आकर्षित करते. या कामासाठी कळसूबाई तरुण मित्र मंडळ जहागीरदारवाडी व बारी मंडळाने सहकार्य केले आहे.

यामध्ये मंडळातील हिरामण खाडे, पंढरीनाथ खाडे, विकास खाडे, अंकुश करटुले, भरत घारे, गुलाब करटुले, साहेबराव भारमल, रवींद्र खाडे, मच्छिंद्र खाडे, राजू खाडे दोन्ही गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य व तरुण मित्रांनी मदत व सहकार्य केले आहे. या तरुण मंडळाला ए.एस.के फाउंडेशन मुंबई व बायफ या संस्थेचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या