Thursday, April 25, 2024
Homeनाशिकप्रभागरचना पुन्हा दोन सदस्यीय?

प्रभागरचना पुन्हा दोन सदस्यीय?

नाशिक । फारूख पठाण Nashik

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ( General Body Elections )राज्य सरकार ठरवणार असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी निवडणूक आयोग ( Election Commission )करणार, असा निर्णय नुकताच विधिमंडळात घेण्यात आला होता तर राज्य सरकारने मुंबई महापालिकेसह काही महापालिकांना पुन्हा एकदा नव्याने प्रभागरचना ( Ward Structure ) करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

नाशिक महापालिकेला ( NMC ) याबाबतचे आदेश प्राप्त झाले नसले तरी आदेश आल्यावर नव्याने प्रभागरचना होणार आहे, तर यंदा त्रिसदस्यीयऐवजी दोन सदस्यीय प्रभागरचना होणार असल्याचे समजते. दरम्यान, 21 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान काय निर्णय होतो याकडेदेखील प्रशासनाचे लक्ष लागून आहे.

नाशिक महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित होते, मात्र करोना लॉकडाऊन तसेच ओबीसी आरक्षणावरून ही निवडणूक आतापर्यंत झालेले नाही. तर नाशिक महापालिकेत पहिल्यांदाच प्रशासक राजवट सुरू झाली आहे. दरम्यान, ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेणार नाही, अशी भूमिका घेण्यात आल्यानंतर राज्य शासनाने एक विशेष प्रस्ताव तयार केला व त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर त्याचे रूपांतर राजपत्रात झाले. दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली असून 21 एप्रिल रोजी यावर सुनावणीदेखील होणार आहे.

दरम्यान, राज्याच्या नगरविकास विभागाने मुंबई महापालिकेसह काही महापालिकांना नव्याने रचना तयार करण्याचे पत्र दिले आहे, मात्र नाशिक महापालिकेला याबाबतचे पत्र मिळालेले नाही. जर पत्र आले तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नाशिक महानगरपालिकेत 122 वरून 133 नगरसेवक निवडून जाणार आहे. त्यादृष्टीने शहरात 43 प्रभाग त्रिसदस्यीय व एक प्रभाग चार सदस्य तयार करून त्याची प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली होती. त्याच्यावर हरकती मागवण्यात येऊन सुनावणीदेखील झाली, तर सहा मार्च रोजी अंतिम अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे रवाना करण्यात आलेला आहे. जर ती रचना रद्द करून पुन्हा नव्याने रचना करण्याचे ठरले तर पुन्हा दोन सदस्य प्रभागरचनेनुसार रचना होणार असल्याची शक्यता आहे.

समीकरण बदलणार

वेळेवर निवडणूक न झाल्यामुळे इच्छुकांमध्ये पूर्वीच काही प्रमाणात नाराजीचे वातावरण दिसत आहे. तर प्रभागरचना त्रिसदस्यीयवरून पुन्हा दोन सदस्य होणार असल्यामुळे काही इच्छुकांमध्ये नाराजीदेखील दिसून येत आहे. प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर काही इच्छुकांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश करून आपली जागा निश्चित करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र काही नेते यांनी सावध भूमिका घेत जोपर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर होणार नाही तोपर्यंत त्यांनी कोणत्या प्रभागातून व कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार हे जाहीर केलेले नव्हते. यामुळे अनेकांचे समीकरण बदलणार तर अनेकांना नव्याने संधी मिळणार, अशीदेखील चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या